Jayakwadi Dam Water : मराठवाड्याची मुख्य जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी (नाथसागर) जलाशयात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नाशिक व वरच्या पाणलोट क्षेत्रातून झालेली जोरदार आवक आता ओसरल्यामुळे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यापासून गोदावरीच्या पात्रात चालू सोडलेले पाणी मंगळवारी मध्यरात्रीनंतर पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. सद्यस्थितीत धरणात 93.43 टक्के उपयुक्त साठा शिल्लक असून जलपातळी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व 18 दरवाजे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले आहेत.
गोदावरी खोऱ्यातील बंधारे तुडुंब; शेतीला व पिण्याला मोठा दिलासा
दरम्यान, 4 ऑगस्टपासून धरणाचे दरवाजे उघडून गोदापात्रात पाणी सोडण्यात आले होते. या सततच्या विसर्गामुळे नदीच्या पात्रातील आपेगाव, हिरडपुरी, पाथरवाला, मंगरूळ आणि लोणी यांसारखे महत्त्वाचे बंधारे काठोकाठ भरले आहेत. तसेच या पाण्याचा काही भाग बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाकडेही प्रवाहित झाला. यामुळे परिसरातील विहिरींच्या आणि बोअरवेलच्या भूजलपातळीत मोठी वाढ झाली असून, खरीप पिकांच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास सुटला आहे.
कालव्यांद्वारे शेतीसाठी पाण्याचा प्रवाह सुरूच
नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला असला, तरी शेतीची गरज ओळखून जायकवाडीच्या डाव्या व उजव्या दोन्ही मुख्य कालव्यांमधून प्रत्येकी 1300 क्युसेक वेगाने पाणी सोडणे सुरूच ठेवण्यात आले आहे. मात्र जलविद्युत केंद्रातील विसर्ग सध्या पूर्णपणे शून्य आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरच्या भागातून पुन्हा पाण्याचा प्रवाह वाढल्यास गरजेनुसार दरवाजे पुन्हा उघडले जाऊ शकतात. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. गेल्या वर्षी याच तारखेला धरणात 92.05 टक्के (1998.313 दलघमी) साठा होता. यंदा तो 2028.388 दलघमीवर पोहोचला असून मागील वर्षापेक्षा परिस्थिती अधिक आशादायक आहे.