मुरमा येथील झोपडपट्टीतील नागरिक तब्बल महिनाभरापासून पाण्याविना

गावात ट्रॅक्टरद्वारे विहिरीत पाणी टाकले जात असले, तरी या भागात पाण्याचा टिपूसही पोहोचत नाही. कारण ग्रामसेविका गावातच येत नाहीत, तर प्रभारी सरपंच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत.

मुरमा येथील झोपडपट्टीतील नागरिक तब्बल महिनाभरापासून पाण्याविना

पैठण (प्रतिनिधी, विजय चिडे) : मुरमा येथील झोपडपट्टीतील सुमारे 300 नागरिक सध्या तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर ग्रामपंचायत सदस्य मोठमोठी आश्वासने देतात, मात्र निवडणूक संपताच ती आश्वासने वाऱ्यावर सोडली जातात, अशी भावना गावकऱ्यांत रुजली आहे. याचा थेट फटका झोपडपट्टीतील महिलांना बसतोय. गावात ट्रॅक्टरद्वारे विहिरीत पाणी टाकले जात असले, तरी या भागात पाण्याचा टिपूसही पोहोचत नाही. कारण ग्रामसेविका गावातच येत नाहीत, तर प्रभारी सरपंच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत.

मराठवाड्याचे जीवनधन मानले जाणारे जायकवाडी धरण याच तालुक्यात असूनही मुरमा गावातील नागरिकांना ड्रममागे 50 रुपये मोजून पाणी विकत घ्यावे लागते, ही मोठी शोकांतिका आहे. या गंभीर परिस्थितीत महिलांना हातातील कामधंदा टाकून रानावनात भटकून हंडाभर पाणी मिळवावे लागत आहे. इतके पैसे खर्चूनही पाणी वेळेवर मिळेलच याची खात्री नाही, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

लाखो खर्चूनही नळाला पाणी नाही
चार वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून ग्रामपंचायतीने पाइपलाइन टाकली, पण आजही या नळांना पाणी सोडले जात नाही. प्रशासन झोपडपट्टीतील या वास्तविकतेकडे डोळसपणे पाहत नाही, असा आरोप नागरिक करत आहेत. स्थानिक सरपंचाच्या घराला मात्र कार्यकर्त्यांमार्फत वेळेवर पाणी पोहोचवले जाते, ही विषमता संतापजनक आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या समस्येवर राजकीय आणि प्रशासनिक दुर्लक्षामुळे गावकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे.

 पाणी न दिल्यास 'हंडा मोर्चा'
गावातील महिलांनी आता थेट इशारा दिला आहे की, जर चार दिवसांत झोपडपट्टीत पाणी पुरवले गेले नाही, तर सर्व महिला हंडा मोर्चा ग्रामपंचायतीवर नेणार. महिलांनी स्पष्ट सांगितले की, घरात पाणी नसल्याने कुठल्याही कामात लक्ष लागत नाही. संपूर्ण दिवस पाण्याच्या विवंचनेत जातो. दररोज शेतशिवारात पाणी शोधत पायपीट करावी लागते. हा अन्याय सहन केला जाणार नाही.

या भीषण पाणी टंचाईच्या काळात ग्रामसेविका एम. आचाळे या गावात अनुपस्थित असून बाहेरूनच कामकाज चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन रिचेबल नव्हता. यामुळे आता ग्रामसेविका या समस्येकडे लक्ष देतील की नाही, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number