Maharashtra Rain: मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पावसाचा रौद्रावतार? पुढील 3 तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 21 आणि 22 जुलैदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain: मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पावसाचा रौद्रावतार? पुढील 3 तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा इशारा

राज्यात मागील काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषतः मुंबई महानगर प्रदेश आणि कोकण किनारपट्टीसाठी हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. २१ आणि २२ जुलैदरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान खात्याने २१ जुलैसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जोरदार पावसासोबतच वेगवान वारे वाहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून काही भागांत अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः डोंगराळ भाग आणि नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, कोकणातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी २४ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या कालावधीत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २३ जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ताज्या हवामान अंदाजानुसार, पुढील तीन तास मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात काही भागांत अचानक जोरदार पाऊस कोसळू शकतो. कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक मंदावणे आणि सखल भागांत पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे आणि समुद्रकिनाऱ्याजवळ किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच मच्छीमारांनीही समुद्रातील परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याने राज्यातील अनेक भागांना दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. पुढील दोन दिवस मुंबई महानगर प्रदेश आणि कोकणासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number