Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर काळाचा घाला; खाजगी बसच्या भीषण अपघातात 38 प्रवासी…

जखमींवर एमजीएम रुग्णालय येथे उपचार सुरू असून बचाव पथकाने तत्काळ मदतकार्य केले.

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर काळाचा घाला; खाजगी बसच्या भीषण अपघातात  38 प्रवासी…

मुंबई: पहाटेची वेळ… रस्त्यावरील शांतता आणि गाढ झोपेत असलेले 38 प्रवासी. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला असून 'मृत्यूचा महामार्ग' ही या मार्गाची ओळख अधिकच गडद झाली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत एका खाजगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस महामार्गावरच कोसळली. या भीषण दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 38 जण जखमी झाले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, शांत असलेल्या सुकेळी खिंडीत अचानक प्रवाशांच्या किंकाळ्या घुमू लागल्या. मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेल्या या ट्रॅव्हल्स बसवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस भीषण रित्या उलटली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 38 प्रवाशांपैकी आठ ते नऊ प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Ratnagiri Passenger Train: कोकणवासीयांनो लक्ष द्या! दादर-रत्नागिरी पॅसेंजरचे 'टर्मिनस' बदलले; आता दादर नाही तर 'या' स्थानकावरून सुटणार गाडी

या अपघातातील सर्वात थरारक क्षण म्हणजे एका महिलेची सुटका. अपघातानंतर एक महिला प्रवासी बसच्या अवजड ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. 'दैव बलवत्तर' म्हणूनच पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने जिवाची बाजी लावून त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले. बचाव पथकाच्या या कामगिरीमुळे त्या महिलेला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात यश आले. बचाव पथकाच्या टीमने जखमींना तातडीने बाहेर काढणे आणि त्यांना योग्य त्या वेळेत रुग्णालयात पोहोचवणे, यासाठी मोलाची भूमिका बजावली.

अपघातातील गंभीर जखमींना तातडीने पनवेल-कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी मदतीसाठी धावून आलेल्या स्थानिक नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवले. सध्या नवी मुंबई आणि मुंबईतील विविध रुग्णालयांत जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण तांत्रिक बिघाड होते की चालकाची डुलकी, याचा तपास नागोठणे पोलीस करत आहेत. मात्र, या अपघाताने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांची मालिका कधी थांबणार? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सुकेळी खिंड ही तशीही अपघातासाठी संवेदनशील मानली जाते, त्यात पहाटेच्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटणे प्रवाशांच्या जिवावर बेतले आहे. प्रशासनाने यावर कडक उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा अशा किती निष्पाप जिवांची आहुती दिली जाईल, याचा अंदाज लावणे कठीण आहे. तूर्तास, पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून बसमधील तांत्रिक बाबींचीही तपासणी केली जात आहे. 

हेही वाचा: Congress Leader Accident: दिल्लीहून परतताना कॉँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; लँड रोव्हरला भरधाव ट्रकची जोराची धडक, चालकही दगावला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number