Mumbai Express Train Speed: पश्चिम रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासाबाबत एक महत्त्वपूर्ण आणि प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि दादर येथून सुरू होणाऱ्या एकूण 23 जोडी गाड्यांचा कमाल वेग आता वाढवण्यात आला आहे. या गाड्यांचा ताशी 110 किमी असलेला वेग आता ताशी 130 किमी करण्यास अधिकृत मंजुरी मिळाली आहे. यामुळे प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेत जवळपास 45 ते 60 मिनिटांची मोठी बचत होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वेगवाढीचे निकष आणि पात्र गाड्यांची यादी
हा वेगवाढीचा निर्णय केवळ अत्याधुनिक एलएचबी (LHB) रेक जोडलेल्या गाड्यांसाठी लागू करण्यात आला आहे. या नव्या निर्णयांतर्गत समाविष्ट केलेल्या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
– दादर-एकतानगर एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-भुज आणि वांद्रे टर्मिनस-भावनगर एक्स्प्रेस या गाड्या ताशी 130 किमी वेगाने धावतील.
– दादर-श्रीगंगानगर, दादर-भगत की कोठी, वांद्रे टर्मिनस-ओखा आणि वेरावळ-वांद्रे टर्मिनस गाड्यांचाही यात समावेश आहे.
– इंदूर-हिसार एक्स्प्रेस आणि ओखा-जयपूर एक्स्प्रेस या गाड्यांनाही 22 एलएचबी डब्यांसह ताशी 130 किमी वेगाने धावण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याशिवाय, अहमदाबाद-पाटणा एक्स्प्रेसमध्ये डब्यांची संख्या 20 वरून 22 करण्यात आली असून या गाडीलाही ताशी 130 किमी वेग मर्यादा लागू होईल.
हेही वाचा – Milk Price Hike : मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 1 सप्टेंबरपासून दुधाच्या दरात मोठी वाढ
प्रत्यक्ष वेगावर परिणाम करणारे घटक
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांचा कमाल वेग ताशी 130 किमी निश्चित करण्यात आला असला तरी संपूर्ण प्रवासात ही गती सातत्याने राखणे शक्य होणार नाही. मार्गावरील कायमस्वरूपी किंवा तात्पुरते वेगनिर्बंध, सिग्नल यंत्रणा, रुळांची क्षमता आणि स्थानकांवरील थांबे यावर गाडीचा प्रत्यक्ष वेग अवलंबून असणार आहे. त्यामुळे वेगवाढीमुळे होणाऱ्या वेळेच्या बचतीचा अचूक आकडा पश्चिम रेल्वेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
प्रवाशांसाठी अधिक सोयीचा प्रवास
पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण प्रवासातील वेळ कमी झाल्याने प्रवास अधिक सुलभ होईल. डब्यांची संख्या वाढवल्यामुळे प्रवाशांना अधिक आसने उपलब्ध होतील आणि ऐन गर्दीच्या काळात प्रवाशांची होणारी कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा – Piggy Bank Savings : 9 वर्ष साठवलेल्या पिगी बँकेतील पैशातून तरुणीने खरेदी केला प्लाट; पहा व्हायरल व्हिडीओ