Central Railway: नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबईतील 14 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अखेर सिडकोने मध्य रेल्वे प्रशासनाकडे पूर्ण केली आहे. देखभालीच्या अभावामुळे स्थानकांची झालेली पडझड आणि प्रवाशांची होणारी मोठी सोय आता लवकरच संपुष्टात येणार आहे. दोन्ही प्रशासकीय यंत्रणांमधील असमन्वयामुळे नवी मुंबईकर प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता.
खासदारांचा पुढाकार आणि बैठकांचे फलित
नवी मुंबई आणि ठाणे मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले होते. स्थानकांमधील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सिडको व मध्य रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेतल्या. मे 2026 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके टप्प्याटप्प्याने रेल्वेकडे सोपवण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला.
दोन टप्प्यांत पार पडलेली हस्तांतरण प्रक्रिया
नवी मुंबईतील एकूण 17 स्थानकांपैकी तरघर, खारकोपर आणि बामणडोंगरी ही 3 स्थानके जून 2026 मध्येच पहिल्या टप्प्यात हस्तांतरित करण्यात आली होती. त्यानंतर आता उरलेल्या 14 स्थानकांची कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले, कारण यातील खारघर, मानसरोवर आणि खांदेश्वर ही स्थानके त्यांच्या मतदारसंघात येतात. या हस्तांतरण प्रसंगी दोन्ही संस्थांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मध्य रेल्वेकडे वर्ग झालेली 14 प्रमुख स्थानके
सिडकोकडून मध्य रेल्वेच्या ताब्यात गेलेल्या स्थानकांमध्ये ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स-दरावे, बेलापूर, ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, खांदेश्वर, मानसरोवर आणि खारघर या 14 स्थानकांचा समावेश आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे आता या सर्व स्थानकांची स्वच्छता, विजेची व्यवस्था, सुरक्षा आणि इतर आधुनिक नागरी सुविधा थेट मध्य रेल्वे प्रशासनाकडून पुरविल्या जातील. त्यामुळे लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.