Monsoon Update: दोन दिवसांपासून पाऊस गायब, आता ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार सरी; हवामान विभागाचा इशारा

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. IMD ने महाराष्ट्रासह ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून काही भागात उष्णतेची लाटही कायम आहे.

Monsoon Update: दोन दिवसांपासून पाऊस गायब, आता ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार सरी; हवामान विभागाचा इशारा

देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्यापही अपेक्षित प्रमाणात पाऊस पडताना दिसत नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काही दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) देशभरातील हवामानासंदर्भात नवा अंदाज जाहीर केला असून, पुढील काही दिवसांत मान्सूनला पुन्हा वेग मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 27 ते 29 जूनदरम्यान उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम तसेच ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा: Divyang Sahayak Portal: आता सर्व सरकारी योजना एकाच क्लिकवर; दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

दरम्यान, मान्सूनची प्रगती हळूहळू पुढे सरकत असून 26 जूनपर्यंत त्याची उत्तर सीमा सुरत, इंदूर, मांडला, डाल्टनगंज आणि मोतीहारीपर्यंत पोहोचल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील तीन ते चार दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या उर्वरित भागात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या दृष्टीनेही हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागात पुढील काही दिवसांत पुन्हा पावसाची तीव्रता वाढू शकते. काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून, राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.

तथापि, पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रातील कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो.

हेही वाचा: Devendra Fadanvis : ठाकरेंच्या त्या बंडखोर खासदारांना भाजपात यायचं होतं? फडणवीसांनी थेट हातच जोडले

दुसरीकडे, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. पूर्व उत्तर प्रदेशात तीव्र उष्णतेचा फटका बसत असून प्रयागराज येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बिहार, झारखंड आणि ओडिशामध्येही तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे.

समुद्रातील परिस्थितीही सध्या प्रतिकूल असल्याने मच्छिमारांसाठी विशेष इशारा देण्यात आला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र परिसरात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने 26 जून ते 1 जुलैदरम्यान मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः कोकण-गोवा किनारपट्टी, कर्नाटक किनारा, श्रीलंका परिसर, मन्नारचा आखात तसेच ओमान आणि सोमालिया किनारपट्टीजवळ समुद्र खवळलेला राहण्याचा अंदाज आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number