FDA Action Mumbai: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्नसुरक्षा कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आस्थापनांविरोधात सुरू केलेली कठोर मोहीम अधिक तीव्र केली आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात खाद्यपदार्थ विक्रेते आणि उपाहारगृहांची कसून तपासणी सुरू आहे. या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून एफडीएच्या विशेष पथकाने मुंबईतील चार प्रमुख रेस्टॉरंट्स आणि खाद्य आस्थापनांवर धडक कारवाई करत त्यांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
अस्वच्छता अन् ड्रेनेजच्या त्रुटी; एफडीएच्या अचानक छाप्यांनंतर कारवाई
कांदिवली येथील 'अक्षय कोर्ट्स', वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) जिओ वर्ल्ड ड्राईव्हमधील 'क्रॉफ्टपॅक हॉस्पिटॅलिटी', दादर पश्चिमेचे 'मे. मारियन हॉटेल' आणि चेंबूर येथील 'मे. भगवती स्टोअर्स' या ठिकाणी एफडीएच्या पथकाने अचानक छापे टाकले. या तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील अस्वच्छता, सांडपाण्याची अयोग्य विल्हेवाट, अन्नपदार्थांची धोकादायक पद्धतीने केलेली साठवणूक आणि संसर्ग पसरण्याची शक्यता (क्रॉस-कंटॅमिनेशन) अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच प्रशासनाने चारही ठिकाणचे परवाने रद्द करण्याचा आदेश दिला.
खेळाडूंच्या खानावळींपासून ते ऑनलाईन डिलिव्हरी ॲप्सपर्यंत प्रशासनाचा दणका
गेल्या काही दिवसांपासून एफडीएने आपला कारवाईचा मोर्चा केवळ पारंपरिक हॉटेल्सपुरता मर्यादित न ठेवता इतर क्षेत्रांकडेही वळवला आहे. नुकतेच मुंबई क्रिकेट असोसिएशनशी (MCA) संबंधित तीन प्रमुख रेस्टॉरंट्सवर अस्वच्छतेप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर 'ब्लिंकिट', 'झिप्टो' आणि 'इन्स्टामार्ट' यांसारख्या क्विक-कॉमर्स कंपन्यांच्या 14 वितरण केंद्रांवरही (डार्क स्टोअर्स) अन्न साठवणुकीतील त्रुटी आणि तापमानाचे प्रमाण न पाळल्यामुळे परवाने निलंबनाची कारवाई झाली आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळल्यास थेट व्यवसाय बंदी
अन्नपदार्थांची हाताळणी करताना कर्मचाऱ्यांची स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि साठवणुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. तुकाराम मुंढे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील खाद्य व्यवसायिकांना आता स्वच्छता आणि गुणवत्तेच्या मानकांचे तंतोतंत पालन करावेच लागणार आहे, अन्यथा थेट व्यवसाय बंद पडण्याचा इशारा एफडीएने दिला आहे.