Pune Airport: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचा भीषण अपघात अत्यंत थोडक्यात टळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुमारे 120 प्रवासी घेऊन हे विमान आकाशात झेप घेण्याच्या तयारीत असतानाच अचानक धावपट्टीवर एक अडथळा निर्माण झाला. अंतिम क्षणी पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला असला, तरी या अचानक घडलेल्या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांची मात्र चांगलीच गाळण उडाली होती.
हा सर्व थरार पुण्याहून जयपूरसाठी उड्डाण करणाऱ्या 'एअर इंडिया एक्सप्रेस'च्या विमानासोबत घडला. टेकऑफसाठी विमानाने धावपट्टीवर वेग पकडला होता, पण त्याचवेळी समोर आलेल्या धोक्यामुळे पायलटने तातडीने आणीबाणीचे ब्रेक लावले. अचानक लागलेल्या या जोरदार ब्रेकमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सतर्कतेमुळे टळला धोका
हा थरारक प्रसंग शुक्रवारी दुपारी 3:15 च्या सुमारास घडला. विमान धावपट्टीवर धावत असतानाच एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या (ATC) यंत्रणेला रनवेवर एक भटका कुत्रा फिरताना दिसला. एटीसीने विनाविलंब धोक्याचा इशारा दिल्यानंतर पायलटने अत्यंत कौशल्याने शेवटच्या सेकंदाला विमानाचा वेग नियंत्रित केला. या आणीबाणीच्या प्रसंगानंतर विमानाची संपूर्ण तांत्रिक तपासणी करण्यात आली. सर्व यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर, तब्बल 100 मिनिटांच्या विलंबाने म्हणजेच दुपारी 4:55 वाजता विमानाला पुन्हा उड्डाणाची परवानगी देण्यात आली.
हेही वाचा – Jalna Accident: जालना-बीड महामार्गावर मोठा अपघात! दोन एसटी बसची भीषण धडक; विद्यार्थ्यांसह 30 ते 40 जण जखमी
विमानतळ परिसरातील भटक्या प्राण्यांचा सुळसुळाट आणि सुरक्षेचा प्रश्न
पुणे विमानतळावरील सुरक्षेचा आणि प्रवाशांच्या जिवाचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 28 जून रोजी देखील भुवनेश्वरहून येणाऱ्या एका विमानाला धावपट्टीवर कुत्रा दिसल्यामुळे लँडिंग न करता हवेतच फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. विमानतळ आणि रनवेसारख्या अत्यंत संवेदनशील भागात वारंवार भटक्या कुत्र्यांचा वावर आढळत असल्याने, येथील सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.