Student Protest Kalyan : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या टायपिंग चाचणीदरम्यान कल्याण पश्चिमेकडील एपीएमसी मार्केट परिसरातील केंद्रावर मोठी गैरसोय समोर आली आहे. राज्यभरातून आलेले हजारो उमेदवार या परीक्षेसाठी उपस्थित राहिले होते. मात्र, केंद्रावर बैठक व्यवस्थेचे योग्य नियोजन नसल्याचा आणि सुरक्षा तपासणीची स्पष्ट यंत्रणा नसल्याचा थेट आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अनेक संगणक धुळीने माखलेले होते, तर काही संगणक सुरूच न झाल्याने विद्यार्थ्यांना 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागली.
सर्व्हर डाऊन आणि उमेदवारांची तुफान गर्दी
दरम्यान, परीक्षा सुरू झाल्यानंतरही सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे चाचणी पूर्ण होऊ शकली नाही, ज्यामुळे वातावरणात गोंधळ निर्माण झाला. सकाळी 10:00 वाजताच्या सत्रातील विद्यार्थी अद्याप केंद्रात अडकलेले असतानाच पुढील सत्रातील म्हणजे 12:15 आणि 3:00 वाजताचे शेकडो उमेदवारही केंद्रावर पोहोचले. यामुळे परिसरात प्रचंड गर्दी झाली. संतप्त झालेल्या 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर एकत्र येत प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले. उमेदवारांसोबत आलेल्या पालकांनीही या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
मूलभूत सुविधांचा अभाव आणि पोलिसांची मध्यस्थी
याशिवाय, केंद्रावर पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने लांबच्या जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. परीक्षा केंद्राबाहेर वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, संस्थेचे संचालक संजय वानखेडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, तांत्रिक अडचणीमुळे प्रिंटिंग प्रक्रियेस उशीर झाला असून ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar: बापरे! भररस्त्यात चालकाने स्वतःचीच कार पेटवली; धक्कादायक कारण समोर
परीक्षेची पुनर्रचना करण्याची मागणी
झालेल्या या सर्व तांत्रिक बिघाडामुळे उमेदवारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे कल्याण येथील केंद्रावरील ही टायपिंग परीक्षा रद्द करून ती पुन्हा नव्याने आयोजित करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी सर्व उमेदवार आणि पालकांनी केली आहे.