Maharashtra Weather: उकाड्यानंतर अखेर दिलासा! राज्यात पुन्हा पावसाची एंट्री; ‘या’ भागांत मुसळधार सरी

महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला

Maharashtra Weather: उकाड्यानंतर अखेर दिलासा! राज्यात पुन्हा पावसाची एंट्री; ‘या’ भागांत मुसळधार सरी

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उष्णता आणि उकाड्याचा त्रास वाढला होता. वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांसह शेतकरीही चिंतेत होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचाही वेग वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यातही वादळी पावसाची शक्यता

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही आज काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागात अद्याप अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नसल्याने खरीप पिकांसाठी शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास शेतीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज

कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाट परिसरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही भागांतही वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुढील चार ते पाच दिवस कसं राहणार हवामान?

हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्यातील वातावरण सध्या पावसासाठी अनुकूल बनत आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस अनेक भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number