राज्यात मान्सूनने अखेर जोर पकडला असून बुधवारी सकाळपासून मुंबईसह कोकण, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हवामान विभागाने मुंबईसह काही भागांसाठी रेड अलर्ट, तर अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबई-ठाण्यासाठी रेड अलर्ट, पुढचे काही तास महत्त्वाचे
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर दिवसभर ऑरेंज अलर्ट कायम राहणार असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट देण्यात आला असून रायगड, सिंधुदुर्ग आणि कोकणातील इतर भागांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढील 72 तास कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता
हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.
मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत
मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शहरातील वाहतुकीला बसला आहे. कुर्ला एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कुर्ला-कमानी मार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहने बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. साकीनाका परिसरातही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांची गती मंदावली. काही दुचाकी पाण्याच्या प्रवाहात घसरल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
नवी मुंबईतील सखल भाग जलमय
नवी मुंबईतही सकाळपासून मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. तुर्भे येथील एपीएमसी चौक आणि वाशी परिसरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.
रायगडातील रानबाजिरे धरण ओसंडून वाहू लागले
रायगड जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरण तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहे. या धरणातून पोलादपूर आणि महाड परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. धरण भरल्यामुळे या भागातील नागरिकांची पाणीटंचाईची चिंता दूर झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
पालघरमध्ये घराची भिंत कोसळली
पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धुकटन परिसरात एका घराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. नारायण केशव काकरा यांच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने घरातील अन्नधान्य, कपडे आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुटुंबीयांनी वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नुकसानग्रस्त कुटुंबाने प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.