MahaDBT Portal Down: राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या 'महाडीबीटी' प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांचे अतोनात नुकसान होत आहे. मागील अडीच महिन्यांपासून ही ऑनलाइन यंत्रणा पुरती कोलमडली असून, यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक अनुदानाच्या तब्बल 72 योजनांचे काम रखडले आहे. पूर्वीची 'शिष्यवृत्ती 1' ही प्रणाली अत्यंत सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने चालत असताना, नवीन 'शिष्यवृत्ती 2' या अद्ययावत पोर्टलचा घाट कशासाठी घातला गेला, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. 1 जून रोजी नवीन पोर्टल सुरू केल्यानंतरही तांत्रिक अडचणींचा डोंगर कायम असल्याने, लाखो लाभार्थी सध्या मदतीपासून वंचित राहिले आहेत.
शासकीय दिरंगाई आणि आश्वासनांचा पाऊस: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला
प्रशासनाकडून सुरुवातीला 15 जूनपर्यंत ही यंत्रणा पूर्ववत होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर 30 जून, 15 जुलै आणि आता ऑगस्ट महिना उजाडला तरीही परिस्थिती 'जैसे थे' आहे. केवळ मुदती वाढवून देत विद्यार्थ्यांची बोळवण केली जात असल्याचा आरोप संस्थाचालक करत आहेत. सध्या अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया वेगात सुरू आहेत. हे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर जेव्हा लाखो विद्यार्थी एकाच वेळी अर्ज भरण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा सर्व्हरवर प्रचंड ताण येऊन यंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील वर्षाचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क अद्याप महाविद्यालयांना न मिळाल्याने संस्थांचे आर्थिक नियोजनही कोलमडले आहे.
हेही वाचा – Maharashtra Government: VIP नंबरसाठी सरकारी तिजोरीतून पैसे नाही! शासकीय वाहनांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
लॉगिन त्रुटी आणि कागदपत्रांचा घोळ
नवीन पोर्टलमध्ये असलेल्या गंभीर दोषांमुळे अर्ज भरताना आणि त्यांची पडताळणी करताना पावलोपावली अडचणी येत आहेत. विद्यार्थी आणि जिल्ह्यांचा मूळ डेटा प्रणालीवरून गायब झाला असून, अनेक महाविद्यालयांना तर अजूनही लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळालेले नाहीत. विद्यार्थी अर्ज भरताना कॉलेजचे नाव न दिसणे, ड्राफ्टमध्ये सेव्ह केलेली माहिती आपोआप नष्ट होणे आणि अपलोड केलेली कागदपत्रे अधिकाऱ्यांना न दिसणे अशा अनेक समस्या समोर येत आहेत. या तांत्रिक त्रुटींमुळे जिल्हा स्तरावरून बहुतांश अर्ज फेटाळले जात आहेत. शासकीय नाकर्तेपणामुळे उद्भवलेला हा मनस्ताप थांबवून पोर्टल तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी जोरदार मागणी सर्व स्तरांतून होत आहे.