Madhya Pradesh Accident : मध्य प्रदेशात दुर्गामूर्ती विसर्जनावेळी अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात पडल्यानं 11 भाविकांचा मृत्यू

विजयादशमीच्या दिवशी मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पंधाना परिसरात दुर्गामूर्ती विसर्जनासाठी जात असलेली ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळली. या अपघातात किमान 11 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत.

Madhya Pradesh Accident : मध्य प्रदेशात दुर्गामूर्ती विसर्जनावेळी अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात पडल्यानं 11 भाविकांचा मृत्यू

विजयादशमीच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जनासाठी निघालेली ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात उलटल्याने खंडवा जिल्ह्यातील पंधाना भागात भीषण दुर्घटना घडली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये पाच मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉलीमध्ये एकूण 14 जण बसले होते. त्यापैकी तीन जणांना वाचवण्यात आले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. ही मंडळी राजगड ग्रामपंचायतीतून दुर्गामूर्ती विसर्जनासाठी आली होती. अपघाताच्या वेळी घटनास्थळी सुमारे 25 लोक उपस्थित होते. पुलावर थांबलेली ट्रॉली अचानक तोल गेल्याने पाण्यात कोसळली आणि प्रवासी पाण्यात पडले.

खंडवा जिल्हाधिकारी ऋषव गुप्ता यांनी सांगितले की, घटनास्थळी सुरक्षेसाठी एक कर्मचारी नेमण्यात आला होता आणि नागरिकांना पुढे न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, काही तरुणांनी उत्साहाच्या भरात तो इशारा दुर्लक्षित केला आणि अपघात घडला. प्रशासनाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. अखेर सर्व 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सामाजिक माध्यमावर लिहिले, “खंडवा आणि उज्जैनजवळील दुर्गाविसर्जनावेळी घडलेल्या अपघात अतिशय वेदनादायी आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना धैर्य मिळावे आणि जखमींची लवकर प्रकृती सुधारावी, यासाठी मी देवी दुर्गेकडे प्रार्थना करतो.”

दरम्यान, जखमींना खंडवा जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासन व बचाव पथकांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शोधमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. गावकरी आणि स्थानिक प्रतिनिधींनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत पुन्हा असे प्रकार होऊ नयेत यासाठी कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

 या दुर्घटनेमुळे संपूर्ण खंडवा जिल्ह्यात तसेच आसपासच्या भागात शोककळा पसरली असून सामाजिक पातळीवर याची चर्चा सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number