मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना लालबाग परिसरात गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर चोरट्यांचं सावट असल्याचं समोर आलं आहे. दर्शनाच्या रांगेतील गर्दीचा फायदा घेत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोकड असा एकूण 1 लाख 87 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरीला गेला. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथील दोन संशयितांना अटक केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात लालबाग परिसरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. याच गर्दीचा फायदा घेत पाकीटमार आणि चोरटे सक्रिय झाल्याचे या घटनांमधून दिसून आले आहे. 14 सप्टेंबर रोजी दर्शनाच्या रांगेत चोरीच्या दोन घटना घडल्या.
दर्शनाच्या रांगेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ गायब
पहिल्या घटनेत लालबाग परिसरात राहणाऱ्या 67 वर्षीय वर्षा विश्वनाथ फोपळे या सकाळी सुमारे 10.15 वाजता डॉ. बी. ए. रोडवरील कुबल मसाल्याजवळ दर्शनाच्या रांगेत उभ्या होत्या. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गर्दीत त्या साडी व्यवस्थित करत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ गायब झाल्याचे लक्षात आले.
या माळेचे वजन सुमारे 10 ग्रॅम असून तिची किंमत अंदाजे 70 हजार रुपये असल्याची माहिती आहे. नात कस्तुरी फोपळे यांच्यासोबत त्यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
याच दर्शनाच्या रांगेत सायन-कोळीवाडा येथील 49 वर्षीय धनंजय विष्णू बालसराफ यांच्यासोबतही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे 13 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लांबवली. या चेनची किंमत जवळपास 90 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
मोबाईल आणि रोकड चोरी करताना चोरटे रंगेहाथ पकडले
दुसरी घटना दुपारी साडेएकच्या सुमारास घडली. मालाड येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे 28 वर्षीय मायकेल बबलू नाडर दर्शनाच्या रांगेत उभे होते. त्यावेळी दोन संशयितांनी त्यांच्या खिशातून 25 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि 2 हजार 300 रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप आहे.
चोरी झाल्याचे लक्षात येताच मायकेल यांनी आरडाओरड करत मदतीसाठी आवाज दिला. त्यानंतर पळून जाणाऱ्या दोन्ही संशयितांचा भाविकांनी पाठलाग केला आणि त्यांना पकडले. यावेळी संतप्त जमावाने दोघांना मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच साद्या वेशात गस्तीवर असलेल्या काळाचौकी पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेत जमावापासून त्यांची सुटका केली.
दोन्ही आरोपी इंदूरचे रहिवासी
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आरिफ सकसेनसिंह गुज्जर (24) आणि सोमनाथ समनसिंह राठौड़ (23) अशी आहेत. दोघेही मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास काळाचौकी पोलीस करत आहेत. लालबाग परिसरातील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या मोठ्या टोळीचा या घटनांशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच या टोळीत आणखी किती जणांचा सहभाग आहे, याची माहितीही पोलीस घेत आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात लालबागमध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईलची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.