भंडारा: लाखांदूर येथे घडलेल्या धक्कादायक प्रकरणामुळे परिसरात विषण्ण वातावरण निर्माण झाले आहे. पत्नी आणि मुलाच्या मृत्यूस वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत विवेक शहरे यांनी गेल्या महिन्यात ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणामुळे तणाव वाढत असताना परिस्थिती शांत करण्यासाठी प्रहार संघटनेचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र देशपांडे रुग्णालयात पोहोचले. मात्र मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या देशपांडेंचा वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय ठाकरे यांच्याशी जोरदार वाद झाला. वादाचे स्वरूप एवढे तीव्र झाले की, जयेंद्र देशपांडे यांनी रुग्णालय पेटवून देण्याची धमकी दिल्याचा आरोप पुढे आला आहे.
याच दरम्यान डॉक्टरांना उद्देशून अपमानास्पद भाषा वापरल्याचेही सांगितले जाते. या घटनेनंतर डॉ. ठाकरे यांनी गंभीर तक्रार नोंदवली. त्यांच्या मते, वाद थांबवून देण्याच्या नावाखाली त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत वारंवार फोन करून तब्बल 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. घडलेल्या प्रकारामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा: 'न्याय नव्हे, विश्वासघात!'; पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याशी आईनेच बांधली लग्नगाठ
डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना, तपास यंत्रणा घटनाक्रमाची सखोल चौकशी करत आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास पूर्ण केल्यानंतर जयेंद्र देशपांडे यांच्याविरोधात कलम 308(2), 132, 296, 352, 356 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गंभीर स्वरूपाच्या या कलमांमुळे प्रकरणाची तीव्रता अधिक वाढली आहे. सध्या या घटनाची चौकशी लाखांदूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विवेक शहरे यांच्या कुटुंबातील दुःख, डॉक्टरांवर झालेल्या धमक्या आणि रुग्णालयातील तणावपूर्ण वातावरणामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्य उजेडात यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.