Mumbai Pune Railway: पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या मध्य रेल्वेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या कर्जत-लोणावळा घाटातील रेल्वे वाहतूक अखेर पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खंडाळा आणि मंकी हिल दरम्यान डोंगराचे कडे खचून मोठे दगड थेट रुळांवर आले होते. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून तिन्ही मार्गावरील गाड्यांची वाहतूक पूर्णपणे रोखावी लागली होती. सलग 23 दिवसांच्या अहोरात्र दुरस्तीच्या कामानंतर 28 जुलैच्या संध्याकाळी 'अप' मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
या नैसर्गिक आपत्तीचा मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फटका बसला. जवळपास तीन आठवड्यांच्या काळात 665 हून अधिक एक्सप्रेस आणि लोकल फेऱ्या रद्द किंवा वळवण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली होती.
दुर्गम आणि डोंगराळ भागात पडणारा पाऊस, निसरडे रस्ते आणि खडतर हवामान अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे आव्हान पेलण्यासाठी मध्य रेल्वेने अवाढव्य यंत्रणा उतरवली होती. सुमारे 11,745 कामगार व तंत्रज्ञांच्या फौजेने सलग 24 तास काम करत ही मोहीम फत्ते केली.
ढिगारा उपसण्यासाठी 18 जेसीबी, 20 पोकलेन आणि 110 पेक्षा जास्त विशेष रेल्वे रॅकचा वापर करून दुरुस्तीचे साहित्य दुर्गम ठिकाणी पोहोचवण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे आता मुंबई-पुणे रेल्वे प्रवास पुन्हा एकदा सुरक्षित, जलद आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर झाला आहे.