पुणे : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तब्बल ७९ दिवसांनंतर पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा मित्र रितेश हांगे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येच्या कटाची माहिती रितेशला आधीपासून होती आणि तरीही त्याने पोलिसांना याबाबत कळवले नाही, असा तपास यंत्रणांचा संशय आहे.या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना यापूर्वीच अटक झाली होती. रितेशच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
WhatsApp चॅट ठरले महत्त्वाचे
तपासादरम्यान चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्यातील WhatsApp संभाषण पोलिसांच्या हाती लागल्याचे समोर आले आहे. हे संभाषण रितेशने डिलीट केले होते. मात्र, तपास यंत्रणांनी ते पुन्हा रिकव्हर केल्यानंतर त्यातून काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा केला जात आहे.याच डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी रितेशला अटक केल्याची माहिती आहे. रितेश हा चेतन आणि सिया यांचा वर्गमित्र असल्याचेही तपासात समोर आले आहे.
लोहगडावर जाण्याचेही केले होते आवाहन
पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जून रोजी चेतन आणि सिया यांनी रितेशलाही लोहगडावर येण्यास सांगितले होते. मात्र, त्याने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर केतनची हत्या झाली.विशेष म्हणजे, घटनेनंतरही चेतन आणि सिया यांचा रितेशशी संपर्क सुरू असल्याचे तपासात आढळून आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हत्येपूर्वी आणि हत्येनंतर त्यांच्यात नेमका कोणता संवाद झाला, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.रितेश मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती आहे. अटकेनंतर त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
२६ वर्षीय केतन अग्रवाल हा रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित होता. सिया गोयलसोबत त्याचा साखरपुडा झाला होता आणि दोघांचे लग्नही ठरले होते. मात्र, १८ जून रोजी सियाने वाढदिवसाच्या निमित्ताने ट्रेकिंगला जाण्याच्या बहाण्याने केतनला लोहगडावर नेले.पोलिसांच्या तपासानुसार, तिथे चेतन आणि सिया यांनी मिळून केतनला कड्यावरून ढकलल्याचा आरोप आहे. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.मात्र, तपासादरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुराव्यांमुळे पोलिसांना संशय बळावला. त्यानंतर सिया आणि चेतनला अटक करण्यात आली.
प्रेमसंबंधातून हत्येचा आरोप
पोलिसांच्या तपासात सिया आणि चेतन यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. केतन हा त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढल्याचा आरोप तपासात करण्यात आला आहे.सध्या सिया आणि चेतन न्यायालयीन कोठडीत असून येरवडा कारागृहात आहेत. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू आहे. आता रितेशच्या अटकेनंतर त्याला या कटाबाबत नेमकी किती माहिती होती, त्याची भूमिका काय होती आणि हत्येपूर्वी आरोपींमध्ये कोणते नियोजन झाले होते, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.