मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या दिल्लीसह देशभरात झालेल्या तीव्र आंदोलनानंतर अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. असे असताना एकीकडे दिल्लीच्या जंतर मंतरवरील सीजेपी आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन संपलं असलं तरी मुंबईत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी 9 ऑगस्टला विविध विद्यार्थी संघटना रॅली काढणार असल्याची माहिती आहे. नीट परीक्षा पद्धतीत पारदर्शकता, महाराष्ट्रातील टीईटी पेपर फुटी प्रकरण, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, मराठी शाळांचे प्रश्न, अशा अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन एकत्रित आंदोलनाची चळवळ सुरू ठेवणार असल्याचे समजते. देशभरात विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू केलेलं आंदोलन आता मुंबईमध्ये सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे. मुंबईतील विविध विद्यार्थी संघटना एकत्र येत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ही चळवळ सुरू ठेवणार असल्याचा निर्णय विविध विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे. प्रश्न मांडण्यासाठी राजकीय पक्ष नाही, तर विद्यार्थी एकत्र येऊन सुद्धा लढत दिला जाऊ शकतो, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये आल्याचं संघटनांचे म्हणणं आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रश्नांसाठी विविध विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करत विद्यार्थी संघटनांची ही चळवळ सुरू राहणार आहे.