Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर पाणीसंकटाचे सावट! 81 मध्यम धरणांत फक्त 21 टक्के पाणीसाठा

मराठवाड्यात जुलै महिना संपून ऑगस्टची सुरुवात झाली असली तरी पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नाही. त्यामुळे विभागातील धरणे आणि जलसाठ्यांबाबत चिंता वाढू लागली आहे. विशेषतः लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये पाणीसाठा अत्यल्प असल्याने आगामी काळात पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी आवश्यक जलसाठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील ८०४ लघु सिंचन […]

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर पाणीसंकटाचे सावट! 81  मध्यम धरणांत फक्त 21 टक्के पाणीसाठा

मराठवाड्यात जुलै महिना संपून ऑगस्टची सुरुवात झाली असली तरी पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नाही. त्यामुळे विभागातील धरणे आणि जलसाठ्यांबाबत चिंता वाढू लागली आहे. विशेषतः लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये पाणीसाठा अत्यल्प असल्याने आगामी काळात पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी आवश्यक जलसाठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील ८०४ लघु सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १४.९९ टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये सुमारे २४ टक्के पाणी होते. म्हणजेच यंदा पाणीसाठ्यात जवळपास ९ टक्क्यांची घट झाली असून ही बाब चिंतेची मानली जात आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थितीही समाधानकारक नाही. विभागातील ८१ मध्यम प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता १,१२५ दलघमी इतकी असताना त्यामध्ये सध्या केवळ २२१.३२ दलघमी म्हणजे सुमारे २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा सुमारे ३६ टक्के होता. त्यामुळे यंदा पावसाची कमतरता जलसाठ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

यंदाच्या मान्सून हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामावरही परिणाम झाला. जून महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक भागांतील पेरण्या उशिरा झाल्या. जुलैमध्येही पावसाचा जोर अपेक्षेइतका वाढला नाही. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या असल्या तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने जलसाठ्यात मोठी भर पडू शकलेली नाही.

दरम्यान, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या धरणाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी संपूर्ण मराठवाड्याची परिस्थिती सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण आणि जोरदार पावसाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांत काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली असली तरी विभागातील बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक साठा निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होणे आवश्यक आहे. अन्यथा पिण्याच्या पाण्यासह सिंचन व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता येत्या काही दिवसांतील पावसाकडे लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number