Khavadya Dongar Case: छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एकापाठोपाठ एक कुटुंबातील तिघांनी दरीत उडी मारल्याची भीषण घटना उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. कुणाल चांदगुडे (वय 19) याच्यासह त्याला वाचवण्यासाठी गेलेले वडील मुरलीधर चांदगुडे (48) आणि आई संगीता चांदगुडे या तिघांचाही या दुर्दैवी घटनेत करुण अंत झाला. कुणाल हा अभ्यासात अत्यंत हुशार होता आणि दहावीत 92 टक्के गुण मिळवलेल्या आपल्या मुलाला वैद्यकीय क्षेत्रात (डॉक्टर) घडवण्यासाठी वडिलांनी काबाडकष्ट केले होते. मात्र, एका रात्रीत घडलेल्या कौटुंबिक वादाने संपूर्ण हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त केले.
3 तास हृदयद्रावक विनवण्या; आईने दिला होता वेगळे राहण्याचा शब्द
कुणाल जेव्हा टोकाचे पाऊल उचलण्यासाठी डोंगराच्या टोकावर उभा होता, तेव्हा उपस्थित नागरिक आणि त्याच्या आई-वडिलांनी त्याला समजावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल 3 तास हे नाट्य सुरू होते. कुणाल आणि त्याच्या वडिलांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. मुलाचा जीव वाचवण्यासाठी असहाय्य झालेली आई त्याला गळ घालत होती, "बाळा, तुझा आणि तुझ्या बाबांचा वाद आहे ना, आपण दोघे वेगळे राहू, तू खाली ये." परंतु, कुठल्याही विनवण्या कुणालच्या मनाला स्पर्श करू शकल्या नाहीत. मुलाने दरीत उडी घेताच त्याला पकडण्याच्या प्रयत्नात वडीलही खाली कोसळले आणि दोघांना डोळ्यांदेखत खाली पडताना पाहून आईनेही दरीत झोकून दिले.
आयफोनचे कारण अफवा? पोलीस तपासात धक्कादायक माहिती
घटनेनंतर सोशल मीडियावर आणि परिसरात कुणालने आयफोनच्या हट्टापायी हे पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. कुणालकडे आधीपासूनच आयफोन उपलब्ध होता. काही उपस्थितांनी त्याला शांत करण्यासाठी 'नवीन आयफोन 15 घेऊन देतो' असे आमिषही दाखवले होते. त्यामुळे हा वाद आयफोनसाठी नसून वडिल आणि मुलामधील अंतर्गत कौटुंबिक संघर्षातून झाला होता, असे स्पष्ट होत आहे. दुर्दैवाने, घटनेतील तिन्ही घटकांचा मृत्यू झाल्याने या वादाचे मूळ कारण आता कायमचे गूढ बनले आहे.
हेही वाचा – Raigad Crime: विकृतीचा कळस! रायगडमध्ये जन्मदात्या बापाकडूनच अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 2024 पासून…
या घटनेनंतर वडील-मुलामधील वाद आणि आयफोनसाठीचा हट्ट, तसेच आयफोनच्या ईएमआयमुळे कुणाल तणावात होता, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे या सगळ्या चर्चा रंगलेल्या असतानाच दुसरीकडे, मुलाने आयफोनमुळे टोकाचं पाऊल उचललं नसल्याचा खुलासा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केला आहे. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी, या घटनेला 24 तासही झालेले नाहीत. त्यामुळेच प्राथमिक तपासाच्या आधारावर अजून निश्चित सांगता येणार नाही की आयफोनमुळे त्याने टोकाचा निर्णय घेता. दुर्दैवाने तो मुलगा तणावत होता, म्हटलं आहे. खात्रीशीरपणे सांगू शकत नाहीत की आयफोनमुळे त्याने हे पाऊल उचललं. त्याची अडचण काय त्याला विचारलं जात होतं. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला जात होता, असे ही पोलीस उपयुक्तांनी यावेळी सांगितले.