Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील पाण्याचा साठा नियंत्रित करण्यासाठी जलसंपदा विभागाने मुठा नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून होणारा 9405 क्युसेकचा प्रवाह आता अर्ध्यावर म्हणजेच 4708 क्युसेक इतका करण्यात आला आहे. धरणक्षेत्रातील आवक आणि पावसाचा वेग पाहून पुढील काळात या पाण्याचा वेग कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
धरणसाखळीत 22.88 टीएमसी पाणीसाठा जमा
गेल्या 24 तासांत चारही प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये टेमघर येथे 177 mm, पानशेत येथे 108 मिमी, वरसगाव येथे 103 मिमी आणि खडकवासला येथे 29 मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी 6 वाजेपर्यंतच्या 24 तासांत चारही प्रकल्पांमध्ये एकूण 2316 MCFT नवीन पाणी जमा झाले आहे. सध्या खडकवासला धरण 100 टक्के भरले असून पानशेत 82.29 टक्के, वरसगाव 76.88 टक्के आणि टेमघर 61.68 टक्के क्षमतेने भरले आहे. या चारही धरणांचा मिळून सध्या 22.88 TMC जलसाठा झाला असून गेल्या वर्षी याच दिवशी तो 23.60 TMC इतका होता.
प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन
दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून आतापर्यंत एकूण 1.82 TMC पाण्याचा सांडव्याद्वारे विसर्ग करण्यात आला आहे. पावसाची परिस्थिती सातत्याने बदलत असल्याने नागरिकांनी खबरदारी म्हणून मुठा नदीच्या पात्रात उतरू नये. तसेच नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांनी आपली गुरेढोरे, वाहने आणि महत्त्वाचे साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.