ICC Penalty: भारतीय क्रिकेट संघाने 2026 च्या टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले असले तरी, विजयाच्या जल्लोषात एका भारतीय खेळाडूला आयसीसीच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल याच्याशी झालेल्या वादाप्रकरणी भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला आयसीसीने शिक्षा सुनावली आहे. आयसीसीने अर्शदीपच्या वागण्याला धोकादायक मानत शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम झुंज झाली. भारताने विजयासाठी दिलेल्या 250 हून अधिक धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची फलंदाजी कोसळत होती. डॅरिल मिशेल क्रीजवर असताना अर्शदीप सिंगने एक चेंडू टाकला, जो मिशेलने पुन्हा अर्शदीपच्या दिशेने मारला. यादरम्यान मिशेल काही सेकंदांसाठी क्रीजच्या बाहेर होता. अर्शदीपने चेंडू उचलून वेगाने धावबाद करण्यासाठी थ्रो केला, जो थेट डॅरिल मिशेलला लागला. या अनपेक्षित प्रकारामुळे मिशेल प्रचंड संतापला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानातच शाब्दिक चकमक उडाली.
कर्णधाराची मध्यस्थी आणि अर्शदीपची माफी
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कर्णधार सूर्यकुमार यादवने तात्काळ मध्यस्थी केली आणि मिशेलची समजूत काढली. यावेळी पंचांनीही अर्शदीप सिंगला ताकीद देत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. सामना संपल्यानंतर आणि भारताने 96 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर अर्शदीप सिंगने खिलाडूवृत्ती दाखवत थेट डॅरिल मिशेलकडे जाऊन आपली चूक मान्य केली आणि त्याची माफीही मागितली.
हेही वाचा – IPL 2026 Schedule: IPL च्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट; पहिल्या 20 दिवसांचे शेड्युल ‘या’ दिवशी होणार जाहीर
India pacer fined for breaching the ICC Code of Conduct during the #T20WorldCup Final.https://t.co/NbnGMkIbzE — ICC (@ICC) March 10, 2026
आयसीसीकडून 15 टक्के दंड आणि डिमेरिट पॉइंट
सामन्यानंतर अर्शदीपने माफी मागितली असली तरी, आयसीसीने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अर्शदीप सिंगला त्याच्या सामन्याच्या फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, त्याच्या नावावर एक (1) डिमेरिट पॉइंट देखील नोंदवण्यात आला आहे. अर्शदीपची ही कृती ‘अन्याय्य आणि धोकादायक’ असल्याचे आयसीसीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.