कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत संसदेत केलेल्या भाषणाला का उत्तर दिले नाही म्हणून काही सवाल उपस्थित केले होते. मी कुठल्याही कारवाईला किंवा धमकीला घाबरत नाही म्हणत राहुल गांधी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळेला राहुल गांधी यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर बोलणार नाही म्हणत संसदेतील भाषण पटलावरून का हटवलं ? असा सवाल उपस्थित केला आहे.
राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणात गौतम अदानी यांच्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारले होते. गौतमी अदानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कुठून आले याबाबत चौकशीची मागणी केली होती. याशिवाय राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्या सोबत नरेंद्र मोदी यांचे फोटो आहेत त्याबद्दल खुलासा मागविला होता. देशातील जनतेला गौतम अदानी आणि तुमचं जुनं नातं काय आहे याबद्दल माहिती विचारली होती.
राहुल गांधी यांनी यावेळेला मी शांत बसणार नाही, मी तुरुंगात गेलो तरी मी प्रश्न विचारणे सुरूच ठेवेल म्हणत राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मी धमक्यांना घाबरणार नाही म्हणत थेट नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.