राज्यात अनेक ठिकाणी पेरणीनंतरही बियाण्यांची उगवण न झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही शेतकऱ्यांनी नामांकित कंपन्यांचे बियाणे वापरूनही अपेक्षित उगवण न झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे बोगस किंवा निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत पेरणीपूर्वी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, बियाणे खरेदी करताना सर्वप्रथम अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करणे आवश्यक आहे. खरेदी करताना पक्के बिल घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्यात बियाण्यांबाबत तक्रार करायची वेळ आल्यास हे बिलच महत्त्वाचा पुरावा ठरते.
बियाण्याचे पॅकेट घेताना त्यावरील प्रमाणपत्र, उत्पादन व मुदत समाप्तीची तारीख, बॅच क्रमांक आणि कंपनीची माहिती नीट तपासावी. कमी दरात किंवा अनधिकृत विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या आकर्षक ऑफरच्या मोहात पडू नये. अनेकदा जुन्या बियाण्यांचे नव्याने पॅकिंग करून विक्री केली जाते. अशा बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याने उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
शेतकरी घरच्या घरीही बियाण्यांची साधी उगवण चाचणी करू शकतात. त्यासाठी बियाण्यांपैकी १०० दाणे वेगळे काढून ओल्या गोणपाटावर ठरावीक अंतरावर ठेवावेत. त्यावर दुसरा ओला गोणपाट घालून सात दिवस नियमित ओलावा ठेवावा. त्यानंतर दाण्यांपैकी किमान ७० टक्के बियाण्यांना चांगले कोंब आले असतील तर उगवण क्षमता समाधानकारक असल्याचे समजावे.
फक्त बियाणेच नव्हे, तर जमिनीची गुणवत्ता तपासणेही तितकेच आवश्यक आहे. जमिनीचा पोत, सेंद्रिय घटक, आम्लता किंवा क्षारांचे प्रमाण याची माहिती असल्यास योग्य वाणाची निवड करता येते. परिसरातील मागणी पाहून नव्हे, तर आपल्या शेताच्या गरजेनुसार बियाणे निवडणे अधिक फायदेशीर ठरते.
बोगस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाकडून जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथके कार्यरत असतात. शेतकऱ्यांना संशयास्पद बियाण्यांबाबत तक्रार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फसवणूक झाल्याचा संशय आल्यास संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा. तसेच 18002334000 या टोल-फ्री क्रमांकावरही तक्रार नोंदवता येते.
शेतीतील प्रत्येक हंगाम हा शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे थोडीशी काळजी, योग्य माहिती आणि अधिकृत मार्गाने खरेदी केल्यास बोगस बियाण्यांपासून होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते.