Riddhi Thakker Accident : मुंबईहून बस्तरच्या दिशेने रायडिंग मोहिमेवर निघालेल्या एका 24 वर्षीय तरुणीचा छत्तीसगडमध्ये घडलेल्या एका भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रिद्धी ठक्कर असे या महिला रायडरचे नाव असून, त्या मुंबईतील कांदिवली (पश्चिम) भागातील रहिवासी होत्या. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 30 वरील ‘मरकाटोला घाट’ परिसरात एका अज्ञात अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला.
रायडिंग ग्रुपसोबत बस्तरच्या प्रवासादरम्यान अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, रिद्धी ठक्कर या मुंबईहून बस्तरच्या दिशेने निघालेल्या 23 सदस्यांच्या रायडिंग ग्रुपचा एक भाग होत्या. मुंबई-नागपूरमार्गे रायपूरकडे जात असताना, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मरकाटोला घाटात हा अपघात घडला. रिद्धी या आपली ‘बजाज ॲव्हेंजर’ (Bajaj Avenger) दुचाकी चालवत असताना एका भरधाव अज्ञात अवजड वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. अपघातानंतर तत्काळ त्यांना उपचारासाठी चारामा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना धमतरी येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अपघाताच्या काही तास आधीच केली होती पोस्ट
रिद्धी ठक्कर या सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय आणि लोकप्रिय होत्या. इन्स्टाग्रामवर त्यांचे 18 हजारहून अधिक फॉलोअर्स होते आणि त्या @gearglimpse54 या हँडलवरून आपल्या रायडिंगचे क्षण शेअर करत असत. धक्कादायक म्हणजे, या दुर्दैवी घटनेच्या काही तास आधीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्या युट्यूबवरही आपल्या भटकंतीचे आणि रायडिंगचे व्हिडिओ पोस्ट करायच्या. युट्यूब बायोमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख ‘जिथे थ्रॉटल लिंगाचा भेदभाव करत नाही, अशा जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी पॅशनेट रायडर’ असा केला होता.
हेही वाचा – Congress : राजकारणात खळबळ! काँग्रेसमध्ये धूसफूस? प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी
रायडिंगसोबतच त्या एक कुशल ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणूनही कार्यरत होत्या. या घटनेमुळे रायडिंग कम्युनिटी आणि त्यांच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड शोककळा पसरली असून, पुरूर पोलीस या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.