मुंबई : जून महिना संपता संपता मुंबई पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला. आज, मंगळवारी दुपारपासूनच मुंबईसह दक्षिण मुंबई, ठाणे जिल्हा, नवी मुंबई, पालघर, मुंबई उपनगरे या भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून जागोजागी पाणी साचल्याचेही चित्र पाहायला मिळाले. मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने (IMD) आज, मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. दक्षिण आणि मध्य उपनगरांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून नवी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर मुंबईच्या किनारपट्टीवर पावसाचा मोठा पट्टा धडकला असून सखल भागात पाणी साचण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
? Just in: IMD has issued 'Orange Alert' for Mumbai, Thane & Palghar for today amid heavy to very heavy rains ?
Stay safe, Mumbaikars ☔ Time of issue – 6:20 PM #MumbaiRains pic.twitter.com/T38NPJBTNN — Mumbai Rains (@rushikesh_agre_) June 30, 2026
त्यामुळे जुलै महिन्याची सुरुवात पावसाने होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 1 जुलैपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर रायगड जिल्ह्यासाठी 2 जुलैचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यात सांताक्रूझ केंद्रावर सोमवार ते मंगळवार या कालावधीत 28 मिमी पावसाची नोंद झाली. तर कुलाबा येथील किनारी केंद्रावर 32 मिमी पाऊस पडला. एकंदरीत, 1 जून ते 30 जून या कालावधीत सांताक्रूझ वेधशाळेत 416.4 मिमी पावसाची नोंद झाली. तर याच काळात कुलाबा येथील किनारी वेधशाळेत 441 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
गेल्या आठवडाभरात सतत पाऊस पडत असूनही, आकडेवारीनुसार शहरात जून महिन्यातील सरासरी पावसाचे प्रमाण गाठता आलेले नाही. हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, पावसाची ही तूट 25 टक्क्यांहून अधिक आहे. सांताक्रूझ वेधशाळेत जून महिन्यात सरासरी 526 मिमी, तर कुलाबा वेधशाळेत 506 मिमी पाऊस पडतो. मुंबईत यावर्षी नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) उशिरा दाखल झाल्यामुळे पावसाच्या सरासरी प्रमाणात ही तूट निर्माण झाली आहे. शहरात मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख 11 जुलै असली, तरी यंदा तो जवळपास दोन आठवडे उशिरा, म्हणजेच 23 जून रोजी मुंबईत दाखल झाला. मान्सूनच्या आगमनापूर्वी होणारा जोरदार पूर्व-मोसमी पाऊसही शहराला हुलकावणी देऊन गेला. ज्यामुळे मुंबई आणि लगतचे जिल्हे कोरडेच राहिले.
दरम्यान, पावसाच्या या तुटीमुळे मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठा महिनाभरात घटत गेला आहे. गेल्या आठवड्यात 400 मिमीहून अधिक पाऊस होऊनही, मंगळवारी तलावांमधील एकूण पाणीसाठ्यात घट सुरूच राहिली आणि तो एकूण क्षमतेच्या केवळ 6.75 टक्क्यांवर आला. गेल्या वर्षी याच दिवशी पाणीसाठा 40.22 टक्के (किंवा 5.82 लाख दशलक्ष लिटर) इतका होता. त्या तुलनेत ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. जूनमधील पावसाचा हा खंड, या वर्षी देशभरात सरासरीच्या केवळ 90 टक्के म्हणजेच सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा (IMD) अंदाज दर्शवतो. तरीही, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई महानगर क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार 24 तासांच्या कालावधीत 115.6 मिमी ते 204.4 मिमी पाऊस पडण्याची शक्यता असताना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला जातो. तर एका दिवसात 204.4 मिमीपेक्षा जास्त अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यास ‘रेड अलर्ट’ दिला जातो.