Crime News : सोलापूर-धुळे महामार्गावरील तिसगावजवळील 'खवड्या डोंगर' परिसरात एक अत्यंत वेदनादायी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. नवीन मोबाईल फोनच्या मागणीवरून झालेल्या वादातून कड्यावरून उडी मारणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मुलाच्या विरहाने आईनेही कड्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे करुण अंत झाल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.
मोबाईलच्या हट्टावरून वाद अन् तीन तासांचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल (वय 18 वर्ष) या तरुणाचा नवीन मोबाईल फोन घेण्यावरून पालकांशी वाद झाला होता. या अस्वस्थतेतून तो सकाळी १० च्या सुमारास खवड्या डोंगराच्या कड्यावर जाऊन उभा राहिला. मुलगा टोकाचे पाऊल उचलणार या भीतीने त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता हे देखील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. सुमारे तीन तास हा तरुण कड्याच्या टोकावर उभा राहून आत्महत्येची धमकी देत होता. माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पायथ्याशी सुरक्षा जाळी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणाल सतत आपली जागा बदलत असल्याने त्यात यश आले नाही.
वडिलांची धडपड ठरली दुर्दैवी; दृश्य कॅमेऱ्यात कैद
प्रत्यक्षदर्शींच्या मोबाईलमध्ये कैद झालेल्या या थरारक घटनेत, पोलीस आणि ग्रामस्थ कुणालची समजूत काढत असल्याचे दिसत आहे. याच दरम्यान, कुणालचे वडील हळूहळू त्याच्या जवळ गेले आणि त्यांनी त्याचा हात घट्ट पकडून त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच क्षणी कुणालने दरीत उडी घेतली आणि वजनाच्या भाराने वडिलांचे नियंत्रण सुटल्याने तेही त्याच्यासोबत शेकडो फूट खोल दरीत कोसळले.
आईनेही मारली दरीत उडी
आपला पती आणि डोळ्यांसमोर मुलाला दरीत कोसळताना पाहून मानसिक धक्का सहन न झालेल्या आईने क्षणार्धात त्याच कड्यावरून दरीत उडी मारली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने दरीत उतरून शोधमोहीम राबवली, मात्र गंभीर दुखापतींमुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या भीषण दुर्घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.