MHADA Rental Housing Scheme: मुंबईसह महामुंबई क्षेत्रात स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी म्हाडाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे. म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनांमधील जी घरे उच्च किमती किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे विक्रीविना पडून राहिली आहेत, ती सर्व घरे आता नागरिकांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि नागरिकांचा त्रास वाचवण्यासाठी म्हाडा प्रशासनाकडून एक विशेष ऑनलाईन पोर्टल विकसित केले जात असून, दिवाळीच्या मुहूर्तावर हे पोर्टल कार्यान्वित करण्याची तयारी सुरू आहे.
वाढत्या लोकसंख्येला अन् नोकरदारांना मोठा दिलासा
रोजगार, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने दररोज हजारो नागरिक मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये दाखल होतात. सध्याच्या आकडेवारीनुसार महामुंबईतील तब्बल 25 टक्के कुटुंबे ही भाड्याच्या घरांमध्ये वास्तव्य करत आहेत. हीच वाढती गरज ओळखून राज्य सरकारच्या नव्या गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. म्हाडाच्या नव्या पोर्टलमुळे भाडेकरूंना दलालांच्या (एजंट) मध्यस्थीशिवाय थेट पारदर्शकपणे घर भाड्याने घेता येईल. तसेच भाडेकरार, पोलीस पडताळणी आणि स्टॅम्प ड्युटी यांसारख्या सर्व कायदेशीर प्रक्रियाही एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पूर्ण करता येतील.
दलालीतून सुटका अन् वेळेची बचत; म्हाडाच्या महसुलातही होणार वाढ
या निर्णयामुळे मुंबईत नव्याने येणाऱ्या नोकरदारांची आणि नागरिकांची घर शोधण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे मध्यस्थांना द्यावी लागणारी अव्वाच्या सव्वा दलाली वाचणार असून, सर्व कागदपत्रांचे काम घरबसल्या होणार असल्याने नागरिकांच्या वेळेची मोठी बचत होईल. दुसऱ्या बाजूला, वर्षानुवर्षे धूळ खात पडून राहिलेल्या घरांचा योग्य वापर होऊन म्हाडालाही या माध्यमातून नियमित महसूल मिळण्यास मदत होणार आहे. म्हाडाच्या या निर्णयाचे गृहनिर्माण क्षेत्रातून जोरदार स्वागत केले जात आहे.