गणेशोत्सवातील पाच आणि सात दिवसांच्या बाप्पांना अनेकांनी निरोप दिल्यानंतर असंख्य कोकणकर आता मुंबई आणि पुण्याच्या दिशेने परतू लागले आहेत. मात्र, गणेशोत्सवाचा उत्साह अजूनही कायम आहे. गौरी पूजनानंतर ही कोकणाकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते, त्यामुळेच कोकणाकडे जाणाऱ्या आणि पुन्हा परतीच्या प्रवासातील वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर
मिळालेल्या माहितीनुसार, यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे मध्य रेल्वेकडून 14 सप्टेंबर 2026 पूर्वी विशेष रेल्वे गाड्यांचे नियोज केले होते. मात्र, पुन्हा एकदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून दोन विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर केल्या आहेत, त्यामुळेच गणपती उत्सवासाठी धावणाऱ्या विशेष गाड्यांची एकूण संख्या ही आता 390 वर पोहोचली आहे. या अतिरिक्त फेऱ्यांमुळे कोकणाकडे जात असलेल्या आणि परतीचा प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
असं असेल वेळापत्रक
मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, 01009 या क्रमांकाची विशेष गाडी ही 26 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी येथून सुटणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
यानंतर 01010 क्रमांकाची परतीची विशेष गाडी ही 27 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 5 मिनिटांनी सावंतवाडी रोड या स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने रवाना होणार आहे. ही गाडी त्याच दिवशी साधारण 6 वाजून 15 मिनिटांनी मुंबईतील सीएसएमटी येथे पोहोचेल.
कोणते थांबे असतील?
या दोन्ही विशेष गाड्यांना मुंबई आणि कोकण मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांचा समावेश आहे.
खरं तर गणेशोत्सवाच्या दिवसात कोकणात मोठ्या संख्येने कोकणकर आणि गणेशभक्त प्रवास करत असतात, त्यामुळे नियमित असलेल्या रेल्वे सेवांवर मोठी गर्दी होत असते. हीच गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अजून अतिरिक्त रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे.