ठाण्यातील घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा

गायमुख घाट दुरुस्तीमुळे 25-29 एप्रिल दरम्यान घोडबंदर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त, तात्पुरते बदल लागू.

ठाण्यातील घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटाचे दुरुस्तीचे काम सुरू झाल्यामुळे 25 ते 29 एप्रिल या कालावधीत वाहतुकीवर मोठा होणार आहे.  कामामुळे एक मार्ग बंद ठेवण्यात आल्याने पहिल्याच दिवशी घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. विशेषतः अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

गायमुख घाटाचे दुरुस्तीचे काम आणि मेट्रो प्रकल्पाचे सुरू असलेले काम यामुळे आधीच वाहतूक कोंडीत त्रस्त असलेल्या घोडबंदर मार्गावरील नागरिकांना आता पुढील काही दिवस अधिकच मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी घाट दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वाहतुकीच्या सुरळीत व्यवस्थेसाठी काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

वाहतुकीच्या नियोजनानुसार, ठाण्याकडून मीरा-भाईंदर, अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अर्धा तास ब्लॉक उघडण्यात येतो, तसेच मीरा-भाईंदरकडून ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठीही अर्धा तास ब्लॉक उघडण्यात येतो. मात्र, हे नियोजन पुरेसे नसल्याने प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा:गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी; उच्च न्यायालयात याचिका दाखल

ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या घोडबंदर मार्गावरून गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशसह विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. तसेच, या परिसरातील नागरीकरण झपाट्याने वाढल्याने स्थानिक वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या दुरुस्तीच्या काळात वाहतूक व्यवस्थापन अधिक कठीण झाले आहे.

वाहतुकीत झालेले बदल :

ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून या वाहनांना वाय जंक्शनमार्गे खारेगाव, माणकोली, अंजुरफाटा मार्गे गाडी पुढे नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंब्रा व कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजुरफाटा या मार्गाने वाहनांना घोडबंदर मार्ग गाठण्याची सूचना देण्यात आली आहे.

गुजरातहून येणाऱ्या वाहनांसाठी चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद आहे. अशा वाहनांना कामण, अंजुरफाटा, माणकोली, भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या वाहतूक बदलांमुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, मात्र वाहनचालकांनी अतिरिक्त वेळ गाठून नियोजन करणे गरजेचे आहे. प्रशासनानेही वाहनचालकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number