गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी जात असलेल्या प्रवाशांच्या पोर्स अर्बेनिया या वाहनाला राजापूर तालुक्यातील हातिवले येथे भीषण अपघात झालेला आहे. आज सकाळी अंकिता पॅलेससमोर हा अपघात झाल्याची नुकतीच प्राथमिक माहिती समोर आली आहे. या वाहनातून सुमारे 15 प्रवासी प्रवास करत होते. त्यांच्यापैकी 8 ते 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
गणेशोत्सवासाठी घराकडे निघाले…
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथी रहिवासी आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी ते सर्वजण मुंबईहून मालवणच्या दिशेने निघाले होते. मात्र, हातिवले येथे त्यांच्या वाहनाला अचानकच भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने मदतकार्य सुरु केलेय सर्व जखमी प्रवाशांना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी प्रवाशांवर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घडलेल्या अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. वाहनांवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे का किंवा इतर कोणत्या कारणामुळे अपघात घडला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. गणेशोत्सवानिमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक आता मुंबईहून कोकणात जात असताना हा अपघात झाल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्व अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु असून नेमके कारण काय, ते तपासानंतर स्पष्ट होणार आहे.