काही वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील मुन्नाभाईची गांधीगिरी सगळ्यांनाच आठवत असेल. पण अकोल्यामध्ये मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या गांधीगिरीची चर्चा सुरू आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी ‘गांधीगिरी’चा अवलंब करून सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकणाऱ्या चपराक लगावली आहे.
जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयातील भिंती पान, खर्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसल्या. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क स्वत: बादली आणि पाणी घेत ही भिंत साफ करायला सुरूवात केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर खजिल व्हायची वेळ आली.
त्यानंतर आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाची झाडाझडती घेतली. विभागाच्या कार्यालयामध्येच जर स्वच्छता नसेल आणि सर्वत्र थुंकून ठेवलेलं असेल, तर सार्वजनिक ठिकाणांची परिस्थिती कशी असेल, याची कल्पनाच केलेली बरी…
अकोला शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे या कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर आधीच जनतेचा मोठा रोष आहे. अशात जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिल्यावर दिसलेलं दृश्य हे चिड आणणारं होतं. मात्र त्यावर केवळ कर्मचाऱ्यांना फैलावर घेण्याचा मार्ग स्वीकारण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी गांधीगिरीचा वापर केला, आणि कर्मचाऱ्यांना धडा शिकवला.