रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. दरम्यान रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच असून युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियाकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यात, गोळीबारात युक्रेनचे अनेक नागरिक मारले गेले आहेत. रशियाकडून युक्रेनमधील मारियुपोलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांवरून विध्वंसाचे दृश्य दिसत आहे.
रशियाच्या सततच्या हल्ल्यामुळे शहर हादरले असून अनेक नागरिक जीव वाचवण्यासाठी तळघरात आश्रय घेत आहेत. तर अन्नाचा तुटवडा पडल्यामुळे नागरिक दुकानांचे कुलूप तोडून खाद्यपदार्थ चोरत आहेत. तसेच नागरिक बर्फ वितळवून तहान भागवत आहेत. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील मानवतवादी संकट गडद झाले आहे.
मंगळवारीही युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला नाही. सुरक्षित कॉरिडॉरद्वारे लोकांना बाहेर काढण्याचे आणि अन्न, पाणी आणि औषध पुरवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.
रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनमधील सुमी शहरात रशियाने बॉम्बहल्ले केले आहेत. या शहरात अडकलेल्या ५ हजार नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून या हल्ल्यात वृद्ध आणि मुलांसह अनेकांचा मृत्यू झाला आहे.