मुंबई : परदेशात नोकरी लागावी या आशेने अनेक तरुण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेत काही जणांकडून मोठ्या रकमेची फसवणूक केली जात असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. मुंबईतील जुहू परिसरात अशाच प्रकार तब्बल 32 तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तब्बल लाखो रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशना शेट्टी आणि दिव्या पांचाल अशी अटक करण्यात आलेल्या दोन महिलांची नावे आहेत. या दोघींनी मिळून तब्बल 32 तरुणांना सिंगापूर येथे नोकरी लावून देण्याचे आश्वास दिले, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार रमेश शेट्टी हे परवानाधारक परदेशी रोजगार आणि मनुष्यबळ सल्लागार म्हणून व्यवसाय करतात. या दोघींच्या सांगण्यानुसार तक्रारदारांनी जवळपास 32 तरुणांनी एकत्र करून तेरा लाख रुपये रक्कम धनादेशाद्वारे आशना आणि दिव्या यांच्या व्हि.ए इमिग्रेशन या कंपनीला दिला. एकूण 13 लाख रुपयांची रक्कम ही देण्यात आली होती.
त्यानंतर युवकांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दिल्ली पाठवण्यात आले. मात्र, तिथं दिलेला पत्ता हा चुकीचा असल्याने तरुणांनी स्वत:च्या खर्चाने दुसऱ्या ठिकाणी जात वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर दोघींनी तरुणांना बनावट हॉलिडे परमिट ही दिले. या कागदपत्रांमुळे सिंगापूर सरकारने संबंधिक सर्व तरुणांना पुन्हा नोकरीसाठी सिंगापूरमध्ये येण्यास नकार दिला. त्यामुळे सर्व युवकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत मानसिक आणि आर्थिक त्रासही सहन करावा लागला. या संपूर्ण प्रकाराबाबत रमेश शेट्टी यांनी जुहू पोलिस ठाण्यात दोन्ही महिलांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आशना शेट्टी आणि दिव्या पांचाल यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जुहू पोलिस करत आहेत.