FDA Action: नागपूर येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) परिसरातील 'श्री बालाजी उपहारगृहा'वर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत ते तात्काळ सील केलं आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा पथकाने केलेल्या या अचानक पाहणीत अन्न सुरक्षेच्या धोरणांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. वैध परवाना नसताना आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे निष्पन्न झाल्याने ही कडक पावले उचलण्यात आली आहेत.
परवान्याशिवाय बेकायदेशीर विक्री सुरू
मेयो रुग्णालयातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच डॉक्टर दररोज या उपहारगृहात चहा, नाश्ता आणि जेवणासाठी येत असत. मात्र, अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 नुसार व्यवसाय चालवण्यासाठी लागणारा आवश्यक 'अन्न परवाना' (Food License) या कॅन्टीनकडे उपलब्धच नव्हता. कोणताही कायदेशीर परवाना न घेता आणि शासकीय नियमांना पायदळी तुडवून हे उपहारगृह सर्रासपणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीत समोर आले.
अस्वच्छता आणि गंभीर अटींचे उल्लंघन
तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आढळला. खाद्यपदार्थ तयार करताना आणि ते ग्राहकांना देताना आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नव्हती. याशिवाय, तिथून निघणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवारीची योग्य सोय नव्हती, तसेच खाद्यपदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेचा कोणताही अधिकृत अहवाल व्यवस्थापनाकडे नव्हता. यामुळे रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला होता.
कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही गायब
अन्न पदार्थांची हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित वैद्यकीय तपासणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, या उपहारगृहातील एकाही कर्मचाऱ्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल अधिकाऱ्यांसमोर सादर करता आला नाही. आजारी किंवा अस्वच्छ कर्मचाऱ्यांकडून अन्नपदार्थ तयार केले जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आरोग्य यंत्रणेने याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले.
त्रुटींची पूर्तता होईपर्यंत टाळे कायम
नियमबाह्य कारभाराची गंभीर दखल घेत एफडीएने या उपहारगृहाला तात्काळ टाळे ठोकले आहे. जोपर्यंत वैध परवाना काढला जात नाही, कर्मचाऱ्यांचे फिटनेस अहवाल, पाण्याच्या तपासणीचा दाखला आणि स्वच्छतेच्या सर्व त्रुटी दूर करून आवश्यक कागदपत्रे सादर केली जात नाहीत, तोपर्यंत हे कॅन्टीन पूर्ववत सुरू करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.