Dead Fetus in Courtroom: मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात आज एका हताश पित्याने न्यायाची मागणी करण्यासाठी जे पाऊल उचलले, त्याने अवघे न्यायालय आणि उपस्थित वकील सुन्न झाले. एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याची शिक्षा म्हणून कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात पत्नीचा गर्भपात झाला. याच वेदनेने ग्रासलेल्या पतीने आपल्या पोटातच दगावलेले 'भ्रूण' थेट न्यायाधीशांच्या समोर टेबलावर ठेवलं आणि "मरण द्या किंवा न्याय द्या" अशी आर्त हाक दिली.
नेमकं प्रकरण काय?
रिवा जिल्ह्यातील दयाशंकर पांडे हे 'शुभ मोटर्स'मध्ये अकाऊंटंट म्हणून कार्यरत होते. तिथे सुमारे 200 कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रामाणिकपणे या घोटाळ्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, पण हाच निर्णय त्यांच्यासाठी शाप ठरला. या सत्यामुळे संतप्त झालेल्या माफियांनी पांडे आणि त्यांच्या कुटुंबावर जीवघेणे हल्ले सुरू केले.
बाप होण्याचं स्वप्न एका हल्ल्यात भंगलं
दयाशंकर यांचा दावा आहे की, त्यांच्यावर झालेल्या एका हल्ल्यादरम्यान गुंडांनी त्यांच्या गर्भवती पत्नीला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत पोटातील बाळ दगावले. पोलीस आणि प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही जेव्हा काहीच झाले नाही, तेव्हा हताश पांडे आपल्या हक्काच्या पुराव्यासह, म्हणजेच त्या मृत भ्रूणासह थेट हायकोर्टात पोहोचले.
कोर्टात स्तब्धता आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
जेव्हा पांडे यांनी न्यायाधीशांच्या समोर ते भ्रूण ठेवले, तेव्हा काही क्षण कोर्टात भयाण शांतता पसरली. एका पित्याची ही असहायता पाहून न्यायाधीशांसह सर्वच स्तब्ध झाले. मात्र, इतकी संवेदनशील वस्तू कोर्टाच्या आवारात कशी पोहोचली, यावरून आता उच्च न्यायालयाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा – IndiGo CEO Resigns : इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांचा राजीनामा! इंडिगोच्या यशात मोठं योगदान, पण…
न्यायाची याचिका की इच्छा मरणाची मागणी?
दयाशंकर पांडे यांनी यापूर्वी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही लढवल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांच्यावर चार वेळा हल्ले झाले. "प्रशासन गुंडांना पाठीशी घालत आहे, आम्हाला सुरक्षा मिळत नाही. मग अशा जगण्यापेक्षा मला इच्छा मरणाची परवानगी द्या," अशी हृदयद्रावक मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. घटनेनंतर ओमती पोलिसांनी पांडे दांपत्याला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. अद्याप या प्रकरणात कोणावरही कारवाई झाली नसली, तरी या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.