एलफिस्टन पूल पाडणार; मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका

मुंबईतील ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन पूल अखेर पाडणार; पर्यायी मार्गामुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि पालकांना वाहतूक कोंडी व भाडेवाढीचा त्रास संभवतो.

एलफिस्टन पूल पाडणार; मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका

मुंबई:सव्वाशे वर्ष जुना ब्रिटिशकालीन एलफिस्टन पूल अखेर पाडण्यात येणार आहे. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ऐतिहासिक पुलाचा वापर अनेक वर्षांपासून करण्यात येत होता. मात्र पुलाची अवस्था जीर्ण झाल्याने आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मुंबई पोलिस आणि वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग सुचवले असले, तरी मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

पुल बंद झाल्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवास वेळ आणि अंतराच्या बाबतीत त्रासदायक ठरणार आहे. विशेषतः स्कूल बस, रिक्षा आणि खासगी वाहनधारकांना याचा मोठा फटका बसणार आहे. कारण पर्यायी मार्गांचा वापर करताना प्रवासाचे किलोमीटर वाढणार आहेत आणि त्यामुळे इंधन खर्चही वाढणार आहे.

याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या पालकांवर होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईतील स्कूल बस चालक-मालक संघटना इंधन आणि देखभाल खर्च वाढल्याच्या कारणावरून भाडेवाढीचा विचार करत आहेत. काही संघटनांच्या अंदाजानुसार, एक विद्यार्थी मागे दरमहा सुमारे 150 ते 200 रुपये पर्यंत भाडेवाढ होऊ शकते.शाळा सुरू होण्याच्या वेळा आणि ऑफिस टाईम एकाच वेळेस असल्याने पर्यायी मार्गांवरही वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर सर्वसामान्य मुंबईकरही अडकून पडणार आहेत.

हेही वाचा:शेती महामंडळाच्या 22 हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून देणार घरे

स्कूलबस चालक संघटनांनी देखील आपली मतं व्यक्त केली आहेत. एका चालकाने सांगितले की,आम्हाला वेळेआधी निघावं लागेल, अधिक ट्रॅफिकमुळे लहान मुलांना त्रास होतो. शिवाय इंधन खर्च वाढत असल्याने भाडेवाढ अपरिहार्य आहे. दुसऱ्या एका रिक्षाचालकाने सांगितले, दिवसभरात आम्ही किती फेर्‍या करतो हे महत्त्वाचं असतं, पण आता वेळ वाढेल, किमान एक ते दोन फेर्‍या कमी होतील.
या पार्श्वभूमीवर पालकांनीही चिंता व्यक्त केली आहे. एका पालक म्हणाल्या, आधीच मुलांना लवकर उठवावं लागतं, आता प्रवास आणखी वाढणार आहे. शिवाय खर्च देखील वाढणार.

मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा हा बदल तात्पुरता असला, तरी यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. पुलाचा पुनर्बांधणी प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा आणि मुंबईकरांना दिलासा मिळावा, हीच सगळ्यांची अपेक्षा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number