Chakan Road Repair: कामचुकार कंत्राटदारांवर थेट FIR; चाकणच्या पायाभूत सुविधांसाठी प्रशासनाचा सर्वात मोठा निर्णय

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विविध सरकारी विभागांना तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

Chakan Road Repair: कामचुकार कंत्राटदारांवर थेट FIR; चाकणच्या पायाभूत सुविधांसाठी प्रशासनाचा सर्वात मोठा निर्णय

Chakan Road Repair: पुण्यातील महत्त्वाचा औद्योगिक पट्टा असलेल्या चाकण परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची चाळण, वीज ट्रिपिंग आणि अनधिकृत अतिक्रमणांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विविध सरकारी विभागांना तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले. या बैठकीस आमदार बाबाजी काळे, पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्राची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी प्रशासनाने अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजनांची आखणी केली आहे.

31 ऑगस्टची अंतिम मुदत आणि रस्त्यांवरील नो-पार्किंग

चाकण परिसरातील सर्व मुख्य रस्ते आणि साइडपट्ट्यांची डागडुजी करून 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण परिसर खड्डेमुक्त करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. कामात निष्काळजीपणा आढळल्यास कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाहतुकीला अडथळा ठरणार्या अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून नियम मोडणाऱ्या वाहनांवर थेट जप्तीची कारवाई केली जाईल. एमआयडीसीतील रिकाम्या भूखंडांचा वापर पार्किंगसाठी केला जाणार आहे. तसेच वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) 100 जवान दोन पाळ्यांमध्ये तैनात केले जातील आणि बंद पडलेली वाहने त्वरित हटवण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था केली जाईल.

अतिक्रमणांवर बुलडोझर आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर

रस्त्यांवर वाढलेल्या बेकायदेशीर टपऱ्या, स्टॉल्स आणि गोदामांवर 25 ऑगस्टपासून महिनाभराची विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाईल. राजकीय दबावाला बळी न पडता ही अतिक्रमणे हटवून तिथे नवे रस्ते व पदपथ उभारले जाणार आहेत. याशिवाय चाकणमधील तब्बल 500 किलोमीटरच्या रस्ते जाळ्याचे नियोजन डिजिटल पद्धतीने केले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक वाहतूक सिम्युलेशन आणि 500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कमांड सेंटरमधून वाहतुकीवर थेट लक्ष ठेवले जाईल. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अनधिकृत डिव्हायडर कट बंद करून ड्रेनेज व फुटपाथची कामे वेगाने केली जातील.

हेही वाचा – NCP Ajit Pawar: महायुतीतच मोठी राजकीय उलथापालथ! अजित पवार गटातील बड्या नेत्यासह 15 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत

वीजसमस्या निवारण आणि भविष्यातील पायाभूत विकास

औद्योगिक क्षेत्रातील वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसवण्याचे काम 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, तर 31 डिसेंबरपर्यंत संपूर्ण परिसर ट्रिपिंगमुक्त करण्याचा रोडमॅप तयार केला आहे. यापुढे कोणताही नवीन प्रकल्प किंवा रस्तेविकास सुरू करण्यापूर्वी पर्यायी वाहतूक आराखडा सादर करणे बंधनकारक असेल. नाशिक फाटा ते पुढील टप्प्यासाठी प्रस्तावित असलेल्या 28 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. या सर्व कडक पावलांमुळे येत्या काही दिवसांत चाकणमधील परिस्थिती सुधारेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number