कला आणि संस्कृती प्रसाराच्या प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्राचे पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात सोमवारी 22 आॅक्टोबर रोजी फ्रायबोर्गच्या लॅण्डवेर आर्केस्ट्राचं प्रथमच आयोजन करण्यात आलं. भारत – स्वित्झर्लंड मैत्री संबंधांना 70 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘लॅण्डवेर आॅफ फ्रायबोर्ग’ हा कॅंर्टन आणि फ्रायबोर्ग शहरातील मान्यताप्राप्त काॅन्सर्ट आणि मार्चिंग बॅंड आहे.

काय आहे हा लँडवेर बँड?
लॅण्डवेर ऑफ फ्रायबोर्ग हा कँटन आणि फ्रायबोर्ग शहरातील मान्यताप्राप्त कॉन्सर्ट आणि मार्चिंग बँड आहे. 1804 साली सुरू झालेला आणि समृद्ध वारसा असलेला हा ऑर्केस्ट्रा संगीतक्षेत्रात सातत्याने आपले क्षितिज विस्तारत आहे. त्यांनी आपला संच एका जागतिक दर्जाच्या वाद्यवृंदात परिवर्तीत केला आहे. या सर्व वादकांना एकोपा आणि मैत्रीच्या नात्याने एकत्र बांधलं आहे. या बँडने विविध देशांमध्ये सादरीकरण केले आहे आणि आपल्या जागतिक दर्जाच्या संगीताने त्यांनी जगभरातील प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. या बँडचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे फ्रायबोर्गमधील सैन्यांची तुकडी 1858 साली जो गणवेश परिधान करत होते, तोच पेहेराव हे वादकही परिधान करतात.
या वाद्यवृंदातर्फे विस्तृत संगीत कलाकृतींपासून पथसंगीतापर्यंत विविध प्रकारचे संगीत सादर करण्यात येतं. भारत-स्वित्झर्लंड मैत्री संबंधांना 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 2017 साली स्वित्झर्लंडच्या सन्माननीय राष्ट्रपतींनी या अभियानाची सुरुवात केली. सामाजिक योगदान देण्यासाठी लॅण्डवेरतर्फे 4 ते 6 या वयोगटातील मुलांना संगीताचे शिक्षण देण्यावर भर देण्यात येतो.

यावेळी आंतरराष्ट्रीय वाद्यवृंदाने केवळ आपल्या भूमीतील गाण्यांचं वादन केलं असं नव्हे, तर खास भारतीय गाण्यांचेही सूर छेडले. ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार…’ या राज कपूर यांच्या अजरामर गाण्यापासून ते संगीतकार ए. आर. रहमान यांच्या ऑस्कर विनिंग ‘जय हो’ पर्यंत हिंदी गाण्यांचंही वादन केलं. तसंच प्रिसिला ब्रुएल्हार्ट या स्विस तरुणीने कथ्थक नृत्याचाही आविष्कार केला. प्रिसिला हिने 6 वर्षं बनारस येथे कत्थक नृत्याचे धडे घेतले आहेत. तसंच तिने ‘गौरी’ हे भारतीय नावही धारण केलंय.

या प्रसंगी बोलताना, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री श्री जयकुमार रावळ म्हणाले, “संगीत हा भौगोलिक सीमा किंवा वंश यांचा भेदभाव न करता सर्वांना एकत्र करणारा दुवा आहे. आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव देणाऱ्या लॅण्डवेर ऑर्केस्ट्राचे आयोजन करणे ही आमच्यासाठीअभिमानाचीबाब आहे. आपल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाने आमचे मनोरंजन करणाऱ्या सर्व कलाकारांना मी विशेष दाद देतो. या बँडचे यश हे त्यांच्या सर्वोत्तम कलेची साक्ष देते.” तर राज्य पर्यटन मंत्री श्री मदन येरववार म्हणाले, “लॅण्डवेर आणि त्यांच्या गुणी संगीत कलाकारांचे अतिथ्य करणे हा आमचा बहुमान आहे. अनेक शतकांपासून संगीत या कलाप्रकाराने जगभरातील लोकांना जोडले आहे आणि यापुढेही संगीत ही भूमिका बजावणार आहे. या कॉन्सर्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संगीतप्रेमींना लॅण्डवेर आणि स्वित्झर्लंडच्या नागरिकांना समृद्ध व चैतन्यमय इतिहासाची सफर घडेल.”

महाराष्ट्रालासुद्धा संगीत व संस्कृतीची समृद्ध परंपरा आहे. येथील लोकसंगीतात भारूड, गोंधळ, लावणी आणि पोवाड्याचा समावेश होतो. त्याचप्रमाणे नाट्यसंगीत हा निम-शास्त्रीय संगीतप्रकार गेल्या 200 वर्षांपासून येथे रुजला आहे. जागतिक पातळीवरील अनेक संगीतकारांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे आणि कालिदास महोत्सव, एलिफंटा महोत्सव, मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल आणि अजिंठा व वेरूळ महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील कलाकारांना महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. एमटीडीसीने नेहमीच कलाकारांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत. जगभरातील कलाकारांनी या ठिकाणी येऊन आली कला सादर करावी हा या सोहळ्यामागील हेतू होता.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबद्दल-
पर्यटन हे राज्यातील वेगाने प्रगती करणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करणे या उद्दिष्टाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) स्थापन करण्यात आले. स्थापनेपासूनच पर्यटन स्थळांचा विकास आणि देखभाल यात एमटीडीसी आघाडीवर राहिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी या महामंडळातर्फे रिसॉर्ट चालविण्यात येतात. पर्यटकांना सहकार्य करण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी माहिती केंद्रे सुरू केली आहेत. या माहिती केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, तेथे जाण्यासाठी उपयुक्त ठरणारे नकाशे, महाराष्ट्र पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका आणि पर्यटन पुस्तके वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.