भारतात कोरोना काळातील मृत्यूदराबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. नोव्हेंबर २०२१पर्यंत देशात ३२ लाख ते ३७ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचा दावा खासगी अहावालानुसार करण्यात आला. परंतु प्रसार माध्यमांनी केलेला दावा चुकीचा असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची नोंद ठेवण्याची एक सक्षम व्यवस्था आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा आणि राज्य स्थरापर्यंत सरकारने व्यवस्था केली आहे. याद्वारे आकडेवारीची नोंद केली जाते, असे केंद्र सरकारने स्पष्टीकरणात म्हटले आहे. तसेच कोरोनामुळे या कालावधीमध्ये ४.६ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे सरकारने प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
देशात गेल्या २४ तासांमध्ये नव्या ३० हजार ७५७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ५४१ रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे. काल झालेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रीय रुग्णसंख्येत घट झाली असून ३ लाख ३२ हजार ९१८वर पोहचली आहे.