Chincholi Limbaji Siblings Death after Eating Khichdi: संपूर्ण कुटुंबाला घरीच बनवलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री नारायण साहेबराव थोटे (35) आणि त्यांच्या पत्नी देवशाला (30) यांनी मुलगी गायत्री (7) आणि मुलगा आयुष (2) यांच्यासह घरी बनवलेली खिचडी खाल्ली होती. जेवण झाल्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक कुटुंबातील चारही सदस्यांना तीव्र उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्राथमिक उपचार घेऊनही दोन्ही मुलांची प्रकृती वेगाने खालावत गेल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात ही घटना घडली.
दोन चिमुकल्या भावा-बहिणींची जीवनाची झुंज अपयशी
प्रकृती अत्यंत गंभीर बनल्याने 2 वर्षांचा चिमुकला आयुष याला गुरुवारी पहाटे सिल्लोड येथे उपचारासाठी नेले जात असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर गुरुवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे, गंभीर अवस्थेत असलेली 7 वर्षांची गायत्री हिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही आज शुक्रवारी सकाळी गायत्रीने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा – Pune: गणेशोत्सवाआधी FDAचा पुण्यात दणका! 4 ट्रक पनीर-खवा जप्त; तुकाराम मुंढेंच्या ॲक्शनने खळबळ
आई-वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा; थोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या दुर्दैवी घटनेत आई-वडील देवशाला व नारायण थोटे यांच्यावर योग्य वेळेत उपचार झाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, अवघ्या 24 ते 48 तासांच्या अंतरात आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलांना गमावल्यामुळे थोटे दाम्पत्यावर आणि संपूर्ण चिंचोली लिंबाजी गावावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. दोन निष्पाप बालकांचा असा अचानक झालेला मृत्यू संपूर्ण परिसराला चटका लावून गेला आहे.
विषबाधेचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार
घरी बनवलेल्या साध्या खिचडीमुळे संपूर्ण कुटुंबाची तब्येत अचानक कशी बिघडली, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अन्नामध्ये विषारी घटक मिसळले गेले होते की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस आणि आरोग्य विभागाकडून केला जात आहे. डॉक्टरांच्या मते, प्रकृती बिघडण्याचे आणि मृत्यूचे नेमके मूळ कारण अधिकृत फॉरेन्सिक व वैद्यकीय अहवाल (Medical Report) समोर आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल.