Child Tobacco Complaint to Tukaram Mundhe Video: महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या राज्यभरात करत असलेल्या धडक कारवायांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छ हॉटेल्स आणि बनावट औषध कंपन्यांवर त्यांनी कठोर पावले उचलल्याने सर्वसामान्यांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक नागरिक स्वतःहून त्यांना आपल्या भागात कारवाई करण्याचे आमंत्रण देत आहेत. अशातच एका लहान मुलाने मुंढे साहेबांना उद्देशून बनवलेला मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
चिमुकल्याची अनोखी मागणी आणि मजेशीर अंदाज
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर namdev.patil.5015 या अकाउंटवरून हा 30 सेकंदांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एका लहान मुलाने अतिशय मजेशीर भाषेत मुंढे साहेबांकडे गावांमधील मशेरी बंद करण्याची मागणी केली आहे. तो व्हिडिओमध्ये म्हणत आहे:
‘तुकाराम मुंढे साहेब… त्या मिसरीकडे सुद्धा लक्ष द्या. अहो, बायका तोंडामध्ये बुकणा भरतात मिसरीचा आणि मग सगळ्या गावाची मापं काढत बसतात.’ महिला मिसरी लावून गावभर लोकांची चांगली-वाईट चर्चा करत फिरतात, त्यामुळे याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी विनंती त्याने केली आहे.
मशेरी म्हणजे काय आणि त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम
गावाकडच्या भागात तंबाखू भाजून त्याची पावडर बनवली जाते, ज्याला मशेरी किंवा मिसरी असे म्हणतात. अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील वृद्ध व महिला मंडळी टूथपेस्टऐवजी दात घासण्यासाठी किंवा व्यसन म्हणून याचा वापर करतात. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते तंबाखूजन्य मशेरीचा वापर दातांच्या व आरोग्याच्या गंभीर समस्यांना आमंत्रण देतो. यामुळे तोंडाचा कर्करोग आणि दातांचे विकार होण्याचा मोठा धोका असतो.
नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस
हा मजेशीर व्हिडिओ समोर आल्यानंतर काही वेळातच यावर 4000 हून अधिक कमेंट्स आणि लाईक्स आल्या आहेत. नेटकऱ्यांनी या चिमुकल्याच्या बोलण्याच्या पद्धतीचे कौतुक करत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युझर्सनी ‘मुंढे साहेबांनी या गंभीर तक्रारीची लगेच दखल घेतली पाहिजे,’ अशी फिरकी घेतली आहे. तर काहींनी ‘बाळा उगाच नको ती तक्रार करू नकोस, नाहीतर गावातील बायका लाटणे घेऊन तुझ्यामागे लागतील,’ असा सल्ला दिला आहे.
तुकाराम मुंढेंची अन्न सुरक्षेसाठी धडक मोहीम
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून नियमबाह्य काम करणाऱ्या व्यावसायिक आणि भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी धाडी टाकून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. याच कारवायांमुळे प्रेरित होऊन आता लहान मुलेही आपापल्या भागातील गैरप्रकारांचे व्हिडिओ बनवून त्यांच्याकडे दाद मागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – FDA Pune Raid : पुण्यात FDA चा मोठा दणका; कॅम्प भागातील बर्गर किंगसह झेप्टो आणि ब्लिंकिटचे परवाने निलंबित