
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील संविधान चौकात बुधवारी रात्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या दोन वर्षानंतर उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. संविधान चौक येथे डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात पंचशील झेंडे, निळा गुलाल उधळून रात्री बारा वाजता आंबेडकर जंयती साजरी करण्यात आली.
आज दिवसभर शहरात विविध ठिकाणी आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम आयोजित केले आहे. नागपूरातील दीक्षाभूमी येथे देखील देशभरातून अनुयायांची दरवर्षी गर्दी होते. त्यामुळे आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त सुद्धा तैनात केला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. पुण्यात आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे आपण अनेक संग्रहालय बघितले असतीलच. संपूर्ण देशात वेगवेगळ्या शहरात बाबासाहेबांचे अनेक प्रेरणास्थळे आहेत. आज भीमजयंतीनिमित्त पुण्यात बाबासाहेबांचे संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे.
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त डोंबिवलीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी आणि डोंबिवलीकर नागरीकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. मागील २ वर्षा पासून सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली होती. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध हटवल्यामुळे डॉ. बाबासाहेबांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. तसेच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रात्री १२ वाजताच्या सुमारास डोंबिवली पूर्वेत भीम अनुयायांचा जनसागर उसळल्याचे पाहायला मिळाले.