नागपूरमध्ये एसबीआय बँकेच्या शाखेत धक्कादायक लुटीची घटना समोर आली आहे. नागपूर मधील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसबीआय बँकेच्या शाखेत काल संध्याकाळी रोख रकमेच्या लुटीची घटना घडली. सुरज बोरकर या आरोपीने बँकेची वेळ संपल्यानंतर बँकेला लागून असलेल्या एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांच्या हातातील 4 लाख 53 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लुटून नेण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने शाखेच्या आतून प्रवेश करून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकल्याने बँकेत एकच गोंधळ उडाला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसबीआयच्या शाखेत अज्ञात आरोपीने थेट बँकेत प्रवेश करत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
कर्मचाऱ्यांना काही समजण्याच्या आत आरोपीने रोख रकमेवर डल्ला मारत लुटीचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पसार झाले. कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत बँकेपासून काही अंतरावर आरोपी सुरज बोरकरला 4 लाख 53 हजार रुपयांच्या रोकडेसह अटक केली.
त्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान टळले. आरोपीने एटीएममध्ये पैसे भरण्याची वेळ आधीच हेरून रेकी केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपी नेमके किती होते, किती रक्कम लुटण्यात आली आणि या संपूर्ण कटामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.