Reliance Jio : आर्थिक वर्ष संपताना प्रत्येक कर्मचाऱ्याला पगारवाढीची आस असते. पण मागणी मान्य झाली नाही म्हणून चक्क कंपनीचे नुकसान करण्याचा अजब प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी पगारवाढ नाकारल्याच्या रागातून थेट मोबाईल टॉवरची फायबर केबलच कापून टाकली. या कृत्यामुळे 54 टॉवरवरील सेवा विस्कळीत झाली असून, तब्बल 258 तास ग्राहकांना नेटवर्कअभावी मनस्ताप सहन करावा लागला.
काय आहे नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज राजेंद्र पाटील (30, रा. भंडारा) आणि राकेश धांडे (रा. सावरी, लाखनी) हे दोघे जिओ कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते पगारवाढीसाठी आग्रही होते. त्यांनी कंपनीकडे वारंवार मागणी केली आणि संपाचा पवित्राही घेतला. मात्र, कंपनीने त्यांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने या कर्मचाऱ्यांचा संयम सुटला.
258 तास नेटवर्क गुल, कंपनीला लाखोंचा फटका
संतापाच्या भरात या दोघांनी 9 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या फायबर केबलवर कुऱ्हाड चालवली. याचा परिणाम असा झाला की, जिल्ह्यातील 54 मोबाईल टॉवर्सची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. केबल कापल्यामुळे कंपनीचे सुमारे 3 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. तब्बल 258 तास (साधारण 11 दिवस) नेटवर्क नसल्यामुळे हजारो ग्राहकांना संपर्कासाठी संघर्ष करावा लागला.
पोलिसांत गुन्हा दाखल
तथापी, कंपनीच्या तांत्रिक बिघाडाची तपासणी केली असता, हा नैसर्गिक बिघाड नसून घातपात असल्याचे समोर आले. याप्रकरणी रिलायन्स जिओ कंपनीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी मनोज पाटील आणि राकेश धांडे या दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पगारवाढीच्या हट्टापायी थेट गुन्हेगारी पाऊल उचलल्याने संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची चर्चा रंगली आहे.