Shivrajyabhishek Sohala 2026 : महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासातील अत्यंत सुवर्णक्षण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'शिवराज्याभिषेक दिना'चा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. किल्ले रायगडावर दरवर्षी साजरा होणाऱ्या या अभूतपूर्व उत्सवासाठी महाराष्ट्र तसेच देशभरातून लाखो शिवप्रेमी गडावर हजेरी लावतात. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने सुरक्षेचा आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेऊन एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गडाकडे जाणाऱ्या मार्गांवर तसेच मुख्य महामार्गावर शिवभक्तांची वाहने सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 5 आणि 6 जून 2026 रोजी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालणारी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
'या' मार्गांवरून प्रवास टाळा
प्रशासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, 5 जून 2026 रोजी सायंकाळी 4:00 वाजल्यापासून ते 6 जून 2026 रोजी रात्री 10:00 वाजेपर्यंत वाहतुकीचे कडक निर्बंध पाळले जातील. यादरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकण फाटा-नागोठणे ते कशेडी घाट या पट्ट्यात अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय, दुर्गम भागातून गडाकडे जोडणाऱ्या माणगाव-निजामपूर मार्गे पाचाड, माणगाव-ढालघर फाटा मार्गे पाचाड आणि महाड-नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या सर्व अंतर्गत मार्गांवर सर्व प्रकारच्या ट्रक, डंपर आणि मोठ्या व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे अटकाव करण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पाऊल; अत्यावश्यक गाड्यांना बंदीतून सवलत
पुणे, सातारा, मुंबई, कोल्हापूर यांसह विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या शिवभक्तांमुळे महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ निर्माण होते. त्यातच शासकीय यंत्रणांची वाहने आणि सोहळ्याच्या साहित्याची ने-आण करणाऱ्या गाड्यांची संख्याही मोठी असते. मुंबई-गोवा महामार्गावरील नेहमीची अवजड वाहतूक सुरू राहिल्यास अपघात किंवा मोठी वाहतूक कोंडी होऊन शिवभक्तांचा प्रवास खोळंबू नये, म्हणून हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी दूध, भाजीपाला, औषधे, पेट्रोल-डिझेल, ऑक्सिजन आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या नियमातून वगळण्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि पोलिसांच्या गाड्या नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
वाहनचालकांना सहकार्याचे आवाहन
दरम्यान, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाला या नियमांची जमिनीवर काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या 2 दिवसांत इतर व्यावसायिक आणि अवजड वाहनधारकांनी महामार्गाऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करावा, जेणेकरून शिवभक्तांचा रायगडापर्यंतचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोल्हापुरात राज्याभिषेक सोहळा समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर प्रशासनाने हा अंतिम वाहतूक आराखडा जाहीर केला आहे.