अमृतसर येथे दसऱ्याला रावणदहनाला जमलेल्या गर्दीवर दूर्धर प्रसंग ओढावला. रावण-दहन सोहळा पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या शेकडो लोकांना ट्रेनने चिरडलं. या दुर्घटनेत 60 हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर तेथे उपस्थित असलेले मंत्रीमहोदय नवज्योत सिद्धू लोकांना सहाय्य करायचं सोडून पळून गेले. मात्र यावेळी एका व्यक्तीने ट्रॅकवर अडकलेल्या अनेकजणांचे प्राण वाचवले. ती व्यक्ती होती… साक्षात रावण!
रावणदहनापूर्वी सुरू असणाऱ्या रामलीलेमधील रावणाचं पात्र साकारणारा कलाकार दलबीर सिंग याने आपल्या प्राणांची पर्वा न करता रेल्वे ट्रॅकवर अडकलेल्या व्यक्तींचा बचाव केला. सुमारे 7 ते 8 लोकांना त्याने रेल्वे ट्रॅकवरून बाजूला नेऊन त्यांचे प्राण वाचवले. दुर्दैवाने इतरांचा बचाव करताना या कलाकाराचा स्वतःचा पाय ट्रॅकमध्ये अडकला आणि त्याच्या अंगावरून ट्रेन गेली. दलबीर ट्रेनखाली चिरडून ठार झाला.
दलबीरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे. दलबीरचा मुलगा आत्ता केवळ 8 महिन्यांचा आहे. त्यामुळे दलबीरच्या पश्चात दलबीरच्या पत्नीला सरकारने नोकरी देऊन रोजगार पुरवावा अशी दलबीरच्या आईने विनंती केली आहे.
ज्या रावणाचं दहन पाहाण्यासाठी गर्दी जमली होती, त्या गर्दीवरच मृत्यूचा प्रसंग ओढावला आणि विशेष म्हणजे त्यातील अनेकजणांचे प्राण वाचवण्यासाठी धावला तो रावणाचंच पात्र साकारणारा कलाकार.