Abhijit Dipke Warning to Maharashtra Government: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला 14 दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जरांगे यांची प्रकृती खालावत चालली असूनही राज्य सरकारकडून कोणतीही ठोस विचारपूस किंवा तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले नसल्याचा आरोप करत अभिजित दीपके यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. जरांगे यांच्या सुरक्षेशी कोणताही खेळ खेळण्याचा किंवा बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला. सोनम वांगचुक यांच्यासारखी कारवाई इथे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
'कॉमेडियनला बिस्किटं खाऊ घालायला वेळ आहे.. पण जरांगेंशी बोलायला नाही'; दीपके यांची बोचरी टीका
राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमावर कडक शब्दांत ताशेरे ओढताना दीपके यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. 'शासनाला कॉमेडियनला भेटायला आणि त्यांना बिस्किटं खाऊ घालायला वेळ मिळतो, परंतु संपूर्ण मराठा समाजाच्या हक्कासाठी गेल्या 14 दिवसांपासून जीवाची पर्वा न करता उपाशी बसलेल्या मनोज जरांगेंशी चर्चा करायला वेळ नाही,' अशी बोचरी टीका त्यांनी केली. सरकारने स्वतःहून अंतरवाली सराटीत येऊन जरांगेंशी अत्यंत सन्मानपूर्वक चर्चा केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी या वेळी लावून धरली.
'प्रथमेश'च्या आत्महत्येवरून सरकारचे वाभाडे; MPSC च्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी
ग्रामीण भागातील बिकट परिस्थिती आणि रोजगाराच्या अभावावर बोट ठेवत दीपके यांनी 'प्रथमेश' नावाच्या तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेचा दाखला दिला. 'मी कालच प्रथमेशच्या कुटुंबाची भेट घेतली. आज ग्रामीण भागात ना चांगले शिक्षण आहे ना रोजगाराच्या संधी. बडे नेते आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवतात, परंतु सामान्य मराठा कुटुंबातील तरुणांना रोजगाराअभावी जीव गमवावा लागत आहे,' असे सांगत त्यांनी हे सरकारचे पूर्ण अपयश असल्याचे म्हटले. यासोबतच रखडलेल्या MPSC परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तात्काळ तोडगा न काढल्यास अशी दुर्दैवी पावले आणखी तरुण उचलतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
आगामी 'मुंबई आंदोलना'ला पूर्ण पाठिंबा आणि सक्रिय सहभागाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आगामी 'मुंबई आंदोलना'बाबत अभिजित दीपके यांनी मोठी घोषणा केली आहे. या ऐतिहासिक आंदोलनाला आपला आणि सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा असणार असून, आपण स्वतः या आंदोलनात सक्रियपणे उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे पाटील यांच्या संरक्षणासाठी आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी लढा दिला जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी आपल्या वक्तव्यात केला.