मुंबई, २९ जून २०२३, प्रतिनिधी : आषाढी एकादशीनिमित्त आज राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर नगरीत दाखल झाले आहेत. यात कलाकारही मागे नाहीत. विठुरायाला डोळ्यात साठवून घेण्यासाठी भाविक वर्षभर या दिवसाची वाट पाहतात. अभिनेते प्रवीण तरडेने विठ्ठल भेटीचा खास अनुभव फेसबुकवर सामायिक केला.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये प्रवीण तरडेने आपल्या आईवडिलांबाबत लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, ‘काही महिन्यांपूर्वी आई-वडिलांना म्हणालो बोला तुम्हाला कुठे फिरायला जायचंय? तुम्ही म्हणाल तिथं घेउन जातो, म्हणाल त्या देशात. ते म्हणाले पंढरपूरला घेऊन चल. मी म्हणालो- पंढरपूर? का? तर ते म्हणाले की पन्नास वर्ष चालत वारी करतोय पांडुरंगाला कधी जवळून नाही पाहिलं, धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसलाय तो थोडा थोडा… जरा निरखून पाहायचाय.’
या पोस्टमध्ये प्रवीण तरडे यांनी विठ्ठलाचे दर्शना घेतानाचे दोन फोटोही सामायिक केले आहेत. या फोटोत ते विठ्ठल मंदिरात आपल्या आई-वडिलांसोबत दिसत आहेत. तर, दुसऱ्या एका फोटोत प्रवीण तरडे यांचे आई-वडिल विठ्ठलासमोर हात-जोडून उभे आहेत. त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, प्रवीण तरडे हे एका सामान्य वारकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेत. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल तर आईचे नाव रुक्मिणी आहे.